![]() |
‘मूल्यवर्धन ३.०’ राज्यस्तरीय प्रशिक्षणातला सहभागी झालेले नाशिक येथील शिक्षक योगेश कड |
शिक्षणक्षेत्री करण्यासाठी नवे परिवर्तन, आले आले मूल्यवर्धन!’ या टॅग लाईनने सुरू झालेल्या मूल्यवर्धन कार्यशाळेचा आज पहिला दिवस! भल्या पहाटे जाग आली ती मुलांच्या आवाजाने, “ओऽऽऽसर, दार उघडा, गरम पाणी आणून देतो तुम्हाला!” आपल्या वसतिगृहात काही काळ प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून वसतिगृहातील प्रेमळ लेकरं मायेनं अशी साद घालत होती. अर्थात गरम पाणी ज्याचं त्यानं स्वतःच घेतलं, पण शिक्षकांप्रती असणारी निष्ठा पाहून सारेजण भारावले.
प्रशिक्षणाचं स्थळ आहे, भारतीय जैन संघटनेचे शैक्षणिक पुनर्वसन केंद्र, बकोरी फाटा, वाघोली पुणे. १९९३ च्या लातूर जिल्ह्याच्या किल्लारी भूकंपानंतर (1993 Latur Earthquake) अनाथ झालेल्या लातूर, धाराशिव जिल्ह्यातील बेघर, अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना सुरक्षित निवारा, सकस भोजन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफत देऊन त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी हे मंदिर उभारले आहे. (WERC- Wagholi Educational Rehabilitation Center)
सन २०१५ पासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आणि सन २०२२ पासून कोविड बाधित कुटुंबातील मुलामुलींना सर्व सुविधा मोफत पुरवून त्यांना इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT Maharashtra) आणि शांतीलाल मुथा फाऊंडेशन (Shantilal Muttha Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मूल्यवर्धन’ कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. अर्थात २००९ मध्ये बीड जिल्ह्यात याची प्रायोगिक सुरुवात झाली होती. परिणाम चांगले वाटल्याने २०१५ पासून महाराष्ट्रात आणि २०१६ गोवा राज्यात शासनाचा उपक्रम म्हणून याची यशस्वी अंमलबजावणी सुरू झाली आहे. (Mulyavardhan Programme History)
मूल्यवर्धन ३.० कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक आदरणीय डॉ. इब्राहिमजी नदाफ, मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेच्या कार्यकारी संपादक वर्षाराणी भोपळे यांच्यासह सर्व मास्टर ट्रेनर्स व्यासपीठावर उपस्थित होते.
“शालेय जीवनात (विशेषतः प्राथमिक शिक्षणात) शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना दुसरे शिक्षक आठवत नाहीत, म्हणून मूल्ये रुजवून ते वर्धित करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, त्याला योग्य न्याय द्या,” असे आवाहन नदाफ सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
“तुम्ही आपापल्या जिल्ह्यातील सर्वोत्तम शिक्षक आहात. त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी मोठी आहे.” थोडा पॉज घेऊन, “असा आमचा भोळा विश्वास आहे,” असा हसत-हसत चिमटाही त्यांनी काढला! “समाजाबरोबर स्वतःच्या जीवनाला दिशा देण्याची ही संधी आहे, तेव्हा मार्गदीप म्हणून काम करा,” असे आपल्या भाषणाअंती ते म्हणाले.
पहिल्या तासिकेला आपण काय शिकणार आहोत? कसे शिकणार आहोत? यातून मूल्यवर्धन कार्यशाळेचा सविस्तर परिचय आदरणीय नागेश बोडखे आणि अमोल सायंबर या सुलभकांनी ओघवत्या शैलीत करून दिला. कार्यशाळा सुरू असताना आपण सर्वांनी मिळून कोणत्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे, याची संहिता प्रशिक्षणार्थ्यांच्या मदतीने तयार करण्यात आली.
सुरुवातीलाच विविध जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांचं बॉंडिंग वाढावं म्हणून अनोख्या शैलीत एकमेकांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर दुपारच्या सत्रात अशोक गोपाल सरांनी मूल्यशिक्षणाचा परिचय करून दिला. ज्ञानाचा वटवृक्ष कसा दिसेल? असा प्रश्न कुणी मला विचारला, तर मी अशोक गोपाल सरांकडे आदराने अंगुलीनिर्देश करेन! अध्ययन क्षमता आणि अध्ययन निष्पती यामधील नेमका फरक त्यांनी सोदाहरण स्पष्ट केला.
‘सत्र बदलले की, पात्र बदलते' (छात्र तेच असले तरी!) त्यानुसार शेवटच्या सत्रात नागेश बोडखे सरांनी ‘वर्गव्यवस्थापन म्हणजे काय’ आणि ‘शांतता संकेताचा वापर’ याचे गटात प्रात्यक्षिक करवून घेतले. या दरम्यान झालेली चर्चा, वादसंवाद, दिलेली उदाहरणे केवळ अप्रतिम! लक्षात राहिलं ते लक्ष्मीकांत संत सरांचे अभ्यासपूर्ण विवेचन, राजेश भुसारे, पंकज दशपुते आणि जितेंद्र मानकर या त्रयींनी दिलेली समर्पक उदाहरणे.
रात्रीच्या जेवणानंतर पहिल्या दिवसाचं सारं सार लिहित असतांना रूम पार्टनर श्री. मंगेश आहिरे सरांचं त्यांच्या लहानग्या लेकीशी संभाषण सुरू आहे, लहानग्या लेकीच्या केवळ एक दिवसाच्या वियोगाने त्यांचे डोळे पाणावलेत. अर्थात बापाला रडण्याची परवानगी नसते. मात्र, बापालाही रडण्याची मुभा असते, असं आजच्या लिंगसमभावाच्या संवेदनशील विषयाला हाताळतांना जे जाणवले त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. अर्थात बापालाही भावनांना अभिव्यक्त करण्याची मुभा असावी, याची तीव्र जाणीव झाली.
- श्री. योगेश पुंडलिकराव कड
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय,