![]() |
नाशिकच्या स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील मूल्यवर्धन उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी |
वर्तमानपत्रात शालेय उपक्रमांबद्दल विशेष बातमी दिसली की त्या बातमीचे विद्यार्थ्यांकडून सामूहिक वाचन करून घेणे हा शिरस्ताच झालेला दिसून येतो. असा नुकताच अनुभव आला.
तर गोष्ट अशी घडली की दैनिक ‘सकाळ’च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीतील (online) ‘वर्गातील मुले शिकणार एकमेकांकडून, समान आवड असलेल्या विद्यार्थ्यांचे होणार समूह!’ या बातमीचे विद्यार्थ्यांकडून वाचन करवून घेतले.

बातमी ऐकून मुलांनी एकच गलका केला. "सर करा ना मग लगेच गट... द्या ना विषय..!"
मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेतील ‘वैयक्तिक जबाबदार्या' या घटकातील ‘अभ्यासाच्या सवयी’ हा विषय विद्यार्थ्यांना दिला. प्रथम समान आवड व कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट तयार केले. प्रत्येक गटाने चर्चेअंती ‘चांगल्या अभ्यासाच्या सवयी कोणत्या?’ हे सांगायचे असे ठरले.
गटात चर्चेला इतकं उधाण आलं की कधीकधी चर्चा मूळविषय सोडून दुसरीकडे भरकटली, पण गटनायकांनी पुन्हा सर्वांचे लक्ष विषयाकडे वळवले. चर्चेअंती विद्यार्थ्यांनी जवळपास दहा नवे मुद्दे मांडले. गंमत म्हणजे ते पुस्तकातील मुद्द्यांपेक्षा वेगळे होते. ‘पाठ शिकवण्याआधी तो वाचन करून प्रश्न तयार करते/करतो’ ही अभ्यास सवय मुलांनी सांगितल्यावर याच गोष्टीची रूजवणूक झाल्याचे समाधानही वाटले!

सरांनी आपल्या गटातील मुद्दे फळ्यावर लिहिले याचे मुलांना प्रचंड अप्रूप वाटले.
संकलित केलेल्या सर्वोत्तम दहा सवयी फलकावर लिहिल्यानंतर मुलांनी त्यापुढे नेहमी, काहीवेळा आणि क्वचितच असं स्वयंमूल्यमापनही केलं.
या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे विद्यार्थ्यांना थोडं स्वातंत्र्य दिलं तर ते कधीकधी स्वैराचारही करतात; पण जी मुले नेहमी गप्प बसतात, ती गटचर्चेत उत्साहाने सहभागी झाली आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला दिसला.

शेवटी सार एकच “मुलं स्वतःहून खूपकाही शिकतात, त्यांना गरज असते ती फक्त योग्य दिशा दाखवण्याची! शिकवण्यापेक्षा वाटाड्या होणं केव्हाही चांगलं.”