मूल्यवर्धनमधील विद्यार्थी मूल्यांकन

 

मूल्यवर्धन पुस्तिकेतील मूल्यांकन पानाची झलक

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातून मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी करत असताना त्यातील मूल्यांकन प्रक्रिया दिशादर्शक ठरते. हे मूल्यांकन कसे करावे, याचा सखोल वेध या लेखात घेतला आहे. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी शिक्षकांना उपयोगी पडेल अशी मूल्यवर्धनमधील मूल्यांकनाची प्रक्रिया सोप्या उदाहरणांसह मांडली आहे.

मूल्यवर्धनमधील मूल्यांकन

महाराष्ट्र शासनाने या शैक्षणिक वर्षापासून नवीन शिक्षण धोरणाशी सुसंगत केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा स्वीकार केला आहे. त्यानुसार त्याच्या अंमलबजावणीसाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांचे मूल्यवर्धन प्रशिक्षण आनंददायी रीतीने पूर्ण झाले. या नंतर सर्व शाळांमध्ये शिक्षकस्नेही आणि मुलांना रमवणाऱ्या मूल्यवर्धन उपक्रमांचे आयोजन सुरु झाले. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेल्या मूल्यशिक्षणाचे मूल्यांकन करण्याची रूपरेषा आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली असेलच. आता हे मूल्यांकन प्रभावी होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल, याविषयी आपण जाणून घेऊया.

विद्यार्थी मूल्यांकन साधनात श्रेणी नोंदवताना घ्यायची काळजी

मूल्यवर्धन पुस्तिकेत इयत्तेनुसार सहा ते आठ अध्ययन निष्पत्ती आहेत. त्या कितपत साध्य झाल्या हे पाहण्यासाठी पुस्तिकेतील माझी प्रगती/विद्यार्थी मूल्यांकन- भाग 1 आणि माझी प्रगती/विद्यार्थी मूल्यांकन- भाग 2 या उपक्रमात मूल्यांकन साधन दिले आहे. या साधनातील प्रत्येक विधानाबाबत मुलाने प्रथम तीन बिंदू श्रेणी वापरून स्वयं-मूल्यांकन करायचे आहे. नंतर वर्गामधल्या सहाध्यायीचे मूल्यांकन करायचे आहे. 

स्वत:चे किंवा सहाध्यायीचे मूल्यांकन ही पद्धत मुलांच्या सवयीची नाही. त्यांच्या अंगवळणी पडेपर्यंत सोप्या भाषेत पुरेशी उदाहरणे देऊन सराव घ्यावा लागेल. स्व-मूल्यांकनाचे कौशल्य विकसित होईपर्यंत ‘एखादी श्रेणी देताना कोणता विचार केला?’ हे विचारावे लागेल. श्रेणी नोंदविताना घाई न करता मुलांना पुरेसा वेळ द्यावा लागेल. मुलाच्या घरातील वागण्याविषयी पालकांचे मत घेताना पुस्तकी भाषा टाळून त्यांच्या भाषेत संवाद साधावा लागेल. याविषयी पुस्तिकेत शिक्षकांसाठी दिलेल्या सूचना नीट समजून घ्याव्या लागतील.

विद्यार्थी मूल्यांकन साधनातील शिक्षकांच्या नोंदी करताना घ्यायची काळजी

समजा इयत्ता दुसरीच्या साधनातील ‘मला माझ्या क्षमता माहीत आहेत’ या विधानाविषयी शिक्षकांनी मीना तिच्या क्षमता आणि गुणांचे वर्णन करू शकते (किंवा करू शकत नाही). अशी नोंद केली, तर ती योग्य ठरणार नाही.

योग्य नोंद कशी असेल यासाठी एक नमुना पाहूया :

स्व-जाणीव’ या विभागात माझ्या आवडी-निवडी आणि माझे आवडते छंद यामध्ये मीनाने क्रिकेट आवडते असे सांगितले. ती क्रिकेट कोणाकडून शिकली, किती वेळ खेळते, बरोबर कोण असते इत्यादी तपशीलवार सांगितले. बऱ्याचदा ती बॉलिंग करताना दिसते.  आपल्याला काय येते ते अशा प्रकारे व्यवस्थितपणे मीनाला सांगता येते. 

आणखी एक उदाहरण पाहूया. इयत्ता दुसरीच्या साधनातील निरोगी राहण्यासाठी मी चांगल्या सवयीचे पालन करतो/करते असे विधान आहे. (पृष्ठ 25 व 50) त्याविषयी शिक्षकांनी राजू आरोग्य आणि स्वच्छतेच्या मूलभूत सवयींचे पालन करताना दिसतो (किंवा  दिसत नाही). अशी नोंद करणे अपेक्षित नाही.  

नोंदीचा नमुना असा असू शकेल : 

स्वच्छ कपडे, वेळेवर नखे काढणे, डबा खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे या राजूच्या आरोग्याच्या सवयी खूप चांगल्या आहेत; पण राजू वर्गात नकळत पोक काढून बसतो. त्याचे परिणाम सांगितल्यावर आता हे प्रमाण कमी झाले आहे. अशा गोष्टी मुलांनीच एकमेकांना सांगाव्यात, अशी व्यवस्था मी केली आहे.

या उदाहरणातील योग्य नोंदींची वैशिष्ट्ये:

वरील उदाहरणात मीना आणि राजूच्या बाबतीत अध्ययन निष्पत्ती साध्य झाली की नाही एवढेच नोंदवलेले नाही. ते पडताळण्यासाठी बाईनी मूल्यवर्धन उपक्रमातील सहभागाचे निरीक्षण आणि इतर विविध प्रसंगी त्यांच्या वागण्याचे निरीक्षण यांचा आधार घेऊन अंतिम नोंद केली आहे. चांगल्या बाबीचे कौतुक केले आहे. अयोग्य गोष्टीबाबत न कंटाळता शिक्षक सबुरीने, सहनशीलपणे आणि विधायक रीतीने हाताळणी करत आहेत. सुधारणेसाठी अभिनव उपाय शोधत आहेत. 

शा‍ब्दिक नोंदी करताना कोणती काळजी घेऊया?   

  • आतापर्यंत पूर्ण झालेल्या उपक्रमांच्या आधारेच नोंदी करायच्या आहेत.
  • मूल्यांकन साधनातील प्रत्येक विधानाच्या संदर्भात नोंद करण्याचा प्रयत्न असावा, पण ओढून-ताणून नोंद करणे अपेक्षित नाही. ज्या बाबतीत आपले पुरेसे निरीक्षण झाले आहे, त्याच विषयीच्या नोंदी करणे पुरेसे आहे.
  • पुस्तिकेत नोंदीसाठी पहिली ते पाचवीसाठी १० ओळी आणि सहावी ते आठवीसाठी १५ ओळी राखून ठेवल्या असल्या तरी नोंदीमधील ओळी यापेक्षा कमी असू शकतात.
  • नोंद लहान असली तरी चालेल, पण अर्थपूर्ण असावी. केलेल्या नोंदी इतर मुले, शिक्षक, पालक यांना त्या मुलाच्या वागणुकीचे उचित वर्णन करणार्‍या वाटाव्यात. 
  • समग्र प्रगती पत्रकात नोंदी करताना आधार घेता येईल अशा प्रकारे विश्वासार्ह, परिपक्व नोंदी असाव्यात.

मूल्यवर्धन उपक्रम हे सामाजिक, भावनिक, नैतिक अध्ययन घडवण्यासाठी आहेत. अशा अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी लागणारे कौशल्य हे मुलांबद्दलची आस्था आणि चांगल्या नोंदी करण्यासाठी केलेल्या सरावामुळे प्राप्त होत जाते. हे कौशल्य आपल्याला मुलांचे गहन अंतरंग जाणून घेण्यासाठी मदत करते आणि बालस्नेही अध्यापन, अध्ययन, मूल्यांकन करण्याची प्रगत वाट दाखवते.