गोवा: विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने सरकारी शाळांमध्ये सकारात्मक बदल

मूल्यवर्धनच्या एका उपक्रमात सहभागी झालेले सरकारी प्राथमिक शाळा, विठ्ठलपूर या शाळेचे विद्यार्थी
२०१६ पासून गोवा राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. २०२५-२६ या शैक्षणिक मूल्यवर्धन ३.० राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत, वर्तनात, शिस्तीत, स्वच्छतेत आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेत मोठे बदल झाले आहेत. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधील परस्पर संवाद वाढला आहे. सकारात्मक बदल झालेली ही काही शाळांची उदाहरणे...

दामोदर कोकणी प्राथमिक शाळा, गूडी पारोडा, साल्सेट

दामोदर कोकणी प्राथमिक शाळा, गुढी पारोडा ही शाळा ग्रामीण भागात म्हणजेच साल्सेट तालुक्यात आहे. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या या खाजगी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेतील पहिलीचे १२, दुसरीचे २१, तिसरीचे ११, तर चौथीचे १७ असे एकूण ६१ विद्यार्थी मूल्यवर्धन कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. “आमच्या शाळेत मूल्यवर्धन सुरू झाल्यापासून मुलांच्या दृष्टीकोनात आणि वागण्या-वागण्यात बदल दिसू लागला आहे,” असे मुख्याध्यापिका अँन्सि फर्नांडिस मोठ्या अभिमानाने सांगतात.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छता, सहकार्य आणि जबाबदारी असे उपक्रम हाती घेतले. एके दिवशी मुलांनी वर्गात, शाळेच्या परिसरात इकडे-तिकडे पडलेले कागद, कचरा गोळा केला आणि संपूर्ण शाळा स्वच्छ केली. काहींनी तर शाळेबाहेरच्या परिसरातही जाऊन कचरा उचलला. विद्यार्थ्यांच्या ह्या उत्स्फूर्त कृतीचा शिक्षकांना अभिमान वाटतो. काही पाहुण्यांनी तर शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले.

काही विद्यार्थ्यांनी कोरोना काळातही राबविलेले उपक्रम विशेषतः प्रभावी होते. या कृतींमुळे मुलांना जाणवले, की छोटासा प्रयत्नही मोठा बदल घडवू शकतो. आता ही मुले घरी जाऊनही पालकांमध्ये हाच संदेश पोहोचवतात. आई-वडिलांना स्वच्छता राखायला सांगतात, शेजाऱ्यांना मदत करतात. “मूल्यवर्धनाने केवळ शाळा बदलली नाही, तर मुलांचा विचार बदलला आहे. हेच आमचे खरे यश आहे,” अँन्सि फर्नांडिस आवर्जून सांगतात.

सरकारी प्राथमिक शाळा, घोलवाडा, सत्तरी
सरकारी प्राथमिक शाळा, घोलवाडा या शाळेची स्थापना १९९४ मध्ये झाली. पहिली ते चौथीपर्यंतची ही मराठी माध्यमाची शाळा सत्तरी तालुक्यात आहे. शाळेच्या एकूण २० विद्यार्थांचा मूल्यवर्धनमध्ये सहभाग आहे. पूर्वी नियम व मूल्ये ही केवळ धड्यांमधून शिकवली जात होती, पण आता मूल्यवर्धन हा स्वतंत्र विषय म्हणून मुलांमध्ये ही संस्कारमूल्ये रुजवली जात आहेत. यातील उपक्रमांतर्गत या शाळेचे नियम बनवून ती शाळेत लावली आहेत. त्या नियमांनुसार मुले वागतात. शाळेत लवकर येतात, नखं कापतात, जेवणाआधी-नंतर हात स्वच्छ धुतात तसेच महत्त्वाचे म्हणजे रोज आई-वडिलांच्या पाया पडतात, त्यांचा आदर करतात. असे कितीतरी दैनंदिन नियम मुलांनी अंगीकारले आहेत.

शाळेचे शिक्षक अर्जुन गावस सांगतात, “मूल्यवर्धन हा आमच्यासाठी एक नवा आणि महत्त्वाचा विषय ठरला आहे. कितीतरी बदल आम्ही मुलांमध्ये झालेले पाहतो. या साठी मूल्यवर्धन पुस्तिकेचा आम्हाला चांगला फायदा झाला.”

एकंदरीत सकाळची प्रार्थना आणि शाळेच्या बाहेरही स्वतःहून नियमांचे पालन करणे यामुळे विद्यार्थ्यांच्या वागणुकीत सकारात्मक बदल दिसून येत आहे.

सरकारी प्राथमिक शाळा, आडण मडकई, फोंडाशासकीय प्राथमिक शाळा, आदन मडकई या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना १९६३ साली झाली. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. फोंडा तालुक्याच्या मडकई क्लस्टरमध्ये औद्योगिक वसाहतीलगत असलेली ही शाळा स्थानिक मुलांच्या शिक्षणाचे केंद्र आहे. येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत १८ तर पूर्वप्राथमिक वर्गात १२ विद्यार्थी आहेत. यात मुलींचे प्रमाण जास्त असून, बहुतेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबांतील आहेत. नियमितपणे शाळेत उपक्रम राबविले जातात. पुस्तिकेतील उपक्रमानुसार सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षकांच्या मदतीने शाळेत भाजीपाला व औषधी वनस्पतींची छोटी बाग तयार केली आहे.शाळेच्या प्रमुख शिक्षिका हर्षदा फडते (२५ वर्षांचा अनुभव) सांगतात की, गेल्या सहा वर्षांत शाळेत कृतीआधारित शिक्षण राबवले जात आहे. मात्र, मूल्यवर्धनमुळे त्याला दिशा, सखोलता आणि सुसंगत रचना मिळाली. सहयोगी शिक्षण रचना आणि नो हॅण्ड्स अप तंत्रामुळे त्यांच्या अध्यापन कौशल्यातही सुधारणा झाली.”

मूल्यवर्धन शिक्षिका प्रीती नाईक सांगतात, “मूल्यवर्धनमुळे उपक्रमाधारित शिक्षण अधिक सोपे झाले आहे आणि सर्व विषय शिकवताना विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढला आहे.”मूल्यवर्धनच्या घरगुती उपक्रमांमुळे पालकांना शिक्षणाची गुणवत्ता समजली. एकत्र कुटुंबांत राहणारे पालक आता मुलांसोबत अधिक चांगला वेळ घालवतात. त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. या शाळेच्या अनुभवावरून असे दिसते की मूल्यवर्धन विद्यार्थ्यांसोबतच शाळा-शिक्षक-पालक या तिन्ही घटकांना एकत्र आणून शिक्षण अधिक प्रभावी बनवते.

डिचोली तालुक्यातील तीन शाळा

डिचोली तालुक्यातील तीन शाळांमधील शिक्षकांनी मूल्यवर्धनच्या विविध उपक्रमातून उल्लेखनीय बदल घडवले आहेत.

यातील पहिली शाळा- सरकारी प्राथमिक शाळा, माथवाडा, पिलीगावची स्थापना १९६६ साली झाली असून मराठी माध्यमाची ही शाळा ग्रामीण भागात आहे. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आणि एकूण १८ विद्यार्थी आहेत. तिसरीच्या शिक्षिका रुपाली रावल यांनी सहकार्यात्मक शिक्षणरचना अंगीकारून जोडी व गटात काम करायला विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. त्या गटांना समोर येऊन आपले विचार मांडायला प्रोत्साहित करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद, नवकल्पना आणि समज स्पष्ट होत आहे. त्यांना मास्टर ट्रेनरकडून सकारात्मक अभिप्राय मिळाला व रुपाली यांना मूल्यवर्धन चॅम्पियन शिक्षिका ही ओळख दिली.

दुसरी शाळा- सरकारी प्राथमिक शाळा, मेनकुरेम या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना १९६७ साली झाली. पहिली ते चौथीपर्यंतची ही शाळा ग्रामीण भागात असून आणि एकूण ४० विद्यार्थी आहेत. आहे. येथील दुसरीच्या शिक्षिका मनीषा हळदंकर यांनी क्लीन वॉटरउपक्रम सादर करण्यासाठी शैक्षणिक सामग्रीचा प्रभावी वापर केला. यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला तसेच मास्टर ट्रेनरने त्यांचे कौतुक केले. त्यांना देखील मूल्यवर्धन चॅम्पियन शिक्षिका ही ओळख दिली.

तिसरी शाळा म्हणजे सरकारी प्राथमिक शाळा, विठ्ठलपूर या शाळेची स्थापना १९६६ साली झाली असून शाळेत इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंतचे वर्ग आणि एकूण २३७ विद्यार्थी आहेत. मराठी माध्यमाची ही शाळा ग्रामीण भागात आहे. पहिलीच्या शिक्षिका प्रभारी छाया बोकाडे यांनी क्वायेट सिग्नल’ व नीतीपूर्ण वर्गव्यवस्थेसह क्लीन प्लेट’ उपक्रम प्रभावीपणे राबवला. सिग्नलवर सर्व विद्यार्थी लक्ष देतात. मुलांना नियमांची जाणीव करून देऊन पुन्हा विषयाकडे आणले जाते.

ही पद्धत पालकांपर्यंत पोहोचल्याने समाजात शिक्षणाची गुणवत्ता व विद्यार्थी-पालक संवाद वाढले आहेत. शाळा आता हे एक मॉडेल म्हणून दस्तऐवजीकरण करणार असून ते इतर शाळांना शेअर करणार आहे.

सरकारी प्राथमिक शाळा, ओशलबाग, पेडणेशासकीय प्राथमिक शाळा, ओशलबाग या शाळेची स्थापना १९६३ साली झाली. पेडणे तालुक्यातील मराठी माध्यमाची ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. शाळेत स्थानिक व स्थलांतरित असे एकूण १० विद्यार्थी असून हे मल्टी-ग्रेड तसेच बहुभाषिक म्हणजेच हिंदी, मराठी आणि कोंकणी बोलतात. शिक्षिका किरण बुगडे यांनी शाळेत एक प्रभावी मूल्यवर्धन उपक्रम राबविला. शाळेत स्पष्ट नियम व वर्गनियम ठरवले. उदा. शिक्षकाच्या परवानगीने हात उंच करून उत्तर देणे आणि त्यांचे परिणामही नोंदवले. नियम मोडल्यास इतर विद्यार्थी सभ्य पद्धतीने आठवण करून देतात, ज्यामुळे वर्ग स्वयंशिस्त आणि शांत राहू लागला.

जोड्या व गट रचना वापरून किरण बाईंनी भाषा व वयोगटातील अडथळे कमी केले. गटांमधील परस्पर क्रियांमुळे त्यांच्यात संवाद वाढला. सर्वांचा सहभागही दिसून आला. अर्थात शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याची समज पटली. पालकांनाही बदल स्पष्ट दिसू लागले. घरातही मुलांचे नियमपालन आणि स्वायत्त वर्तन दिसते. किरण बाई म्हणतात, मूल्यवर्धनमुळे शिस्त, सहयोग आणि आत्मविश्वास वाढले आहेत. आता इतर शाळांमध्ये हा अनुभव सांगण्यासाठी आमची शाळा तयार आहे.

सरकारी प्राथमिक शाळा, पणजी, तीसवाडीसरकारी प्राथमिक शाळा, पणजी सेंट्रल या कोंकणी माध्यमाच्या शाळेची स्थापना १९०५ साली झाली असून ही शाळा शहरी भागात आहे. येथे मराठी माध्यमाचे पहिली ते चौथीपर्यंत २६ विद्यार्थी आहेत, तर कोकणी माध्यमाचे २७ असे एकूण ५३ विद्यार्थी आहेत. येथे शिक्षिका सौ. स्नेहा चोपडे यांनी मूल्यवर्धनची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर शाळेचे वातावरण लक्षणीय बदलले आहे. पूर्वी मुलांना वर्गातील नियमांविषयी फारशी माहिती नव्हती, मात्र मूल्यवर्धनच्या विविध उपक्रमांमुळे त्यांनी स्वतःच्या सहभागातून वर्गाचे नियम ठरवले आणि ते काटेकोरपणे पाळू लागले. आता वर्गात मुलांच्या बोलण्याचा वेळ वाढला आहे, तर शिक्षकांचा वेळ तुलनेने कमी झाला आहे. या खुल्या संवादामुळे शिकणे अधिक परिणामकारक झाले आहे.

आरोग्य, स्वच्छता, चांगल्या सवयी, योग्य आहार यांसारख्या विषयांवरील उपक्रमांमुळे मुलं नीटनेटके कपडे घालून, नखं कापून, स्वच्छता राखून नीटनेटकेपणे शाळेत येतात. आरोग्यदायी व अयोग्य आहार या विषयावर चर्चा झाल्यावर ते घरी जाऊन पालकांनाही माहिती देतात. त्यामुळे घरातही बदल दिसून येतो. पालक सांगतात, आता मुलं केवळ मदत करत नाहीत, तर चांगले-वाईट यातील फरक समजावूनही सांगतात.
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे गोव्याच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण अधिक जिवंत व अनुभवाधारित झाले आहे. विद्यार्थ्यांचे वर्तन, आरोग्य सवयी, पालकांचा सहभाग आणि शाळा-समाज हे नाते अधिक जवळचे झाले आहे.