या शाळेत दिनांक १५
जून २०२५ पासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथील शिक्षक करीत आहेत.सुरुवातीला पाचवीच्या
वर्गशिक्षिका सौ. हेमलता सोलंकी यांनी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर
त्यांनी १७ विद्यार्थी असलेल्या आपल्या पाचवीच्या वर्गात मूल्यवर्धनचे उपक्रम
नियमितपणे राबवायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी ‘वर्ग नियम
तयार करणे’ हा उपक्रम घेतला. सर्वांना सांगितले, “सर्वांनी होमवर्क म्हणून आपल्या वर्गाचे नियम तयार करून
आणावेत.” दुसऱ्या दिवशी बहुतेक विद्यार्थ्यांनी वर्ग नियम लिहून आणले. काहींनी पाच, काहींनी सहा, तर काहींनी
तीन-चार नियम तयार केले. मग सर्व विद्यार्थ्यांनी चर्चा केली आणि या सर्व
नियमांमधून मुलांनी स्वतःच ‘पाचवीच्या वर्गाचे नियम’ बनवले आणि
ते वर्गात लावले.
काही दिवसांनी एका मुलाने शिक्षिकेला विचारले, “मॅडम, आपण जसे वर्गाचे नियम बनवले, तसेच घरासाठीही नियम बनवू शकतो का?” त्या वेळी शिक्षिका सौ. हेमलता यांनी त्याला होकार देऊन प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. त्या मुलाचे नाव होते समीर सुरेश वड. समीरची कल्पना सर्वांना पटली आणि सर्वांनी आपल्या घरातील नियम बनवायचा निर्णय घेतला.
त्यादिवशी घरी गेल्यावर १३ मुलांनी आपल्या पालकांच्या मदतीने घरासाठी सोपे नियम तयार केले. जागा मिळेल तिथे त्यांनी नियमांचा सजवलेला कागद चिकटवला. काहींनी भिंतीला, काहींनी दाराला, तर अखिल नावाच्या एका विद्यार्थ्याने चक्क ‘घरचे नियम’ तयार करून फ्रीजवर नियम लावले.

“आमच्या मुलाने घरातील नियम तयार केल्यामुळे तो स्वतः पाळतो आणि आम्हालाही पाळायला सांगतो. काही चुकलं तर तो म्हणतो, ‘पापा, हे असं आहे, स्वच्छता पाळायची, निरोगी राहायचं, मम्मीला मदत करायची, इतरांना मदत करायची…’ यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो. आमच्या मुलाचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे अखिलचे पालक महेश भेडिया सांगत होते.
“मूल्यवर्धन
कार्यक्रमातून मुलांनी स्वतः नियम तयार केले आहेत, तर ते नियम पाळतात.
यामुळे त्यांच्यात शिस्तपणा आला आहे. वर्गालाही शिस्त लागली आहे. हा बदल पाहून आम्हाला खूप आनंद
होतो,”
असे शिक्षिका हेमलता अभिमानाने सांगतात.ही आहे देशाच्या एका
कोपऱ्यात समुद्रातील बेटावर वसलेल्या दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित
प्रदेशातील ‘प्राथमिक शाळा कमळीफळीया’ येथील
मुलांच्या कल्पनाशक्तीची गोष्ट. अर्थात, मूल्यवर्धन कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आणि
कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडत असल्याची ही शालेय परिवर्तनाची गाथा आहे.