Banner

पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील शिक्षकांचे (जिल्हा संसाधन गट) प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण!

पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील एकूण १८३९ शिक्षकांचे ४६ बॅचेसद्वारे प्रशिक्षण पूर्ण
विद्यार्थीकेंद्रित, ज्ञान रचनावादावर आधारित मूल्यवर्धन कार्यक्रम महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात २०१५ ते २०२० दरम्यान यशस्वीपणे राबविला गेला आहे. या शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत मूल्यवर्धन ३.०’ या नव्या स्वरुपात राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाचा ‘शालेय शिक्षण व क्रीडा विभाग’ आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन’ (Shantilal Muttha Foundation) यांच्यात या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भातील महत्त्वपूर्ण सामंजस्य करार’ (MOU with Government of Maharashtra) सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दि. २८ एप्रिल २०२५ रोजी झाला आहे.शालेय शिक्षणात परिवर्तन घडविण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल अर्थात ‘मूल्यवर्धन ३.०’ कार्यक्रमांतर्गत राज्यात अभूतपूर्व असे शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT Maharashtra) यांनी राज्यातील एकूण १०७२८ शिक्षकांचे (जिल्हा संसाधन गट) (DRG- District Resource Group) प्रशिक्षण २१ जुलै ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान नियोजित केले आहे. यामध्ये राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून २६६ बॅचेस मध्ये हे शिक्षक प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ४६ बॅचेसद्वारे एकूण १,९०१ शिक्षकांनी (DRG) प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये नागपूर (२२४ शिक्षक), रत्नागिरी (२९१ शिक्षक), पालघर (३०२ शिक्षक), अकोला (१४८ शिक्षक), भंडारा (१२८ शिक्षक), वाशिम (१३६ शिक्षक), कोल्हापूर (४०८ शिक्षक) आणि नंदुरबार (२०९ शिक्षक) या जिल्ह्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील सरासरी उपस्थितीचे प्रमाण उत्तम होते. अर्थात, पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मूल्यवर्धन प्रशिक्षणास भरभरून प्रतिसाद दिला आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षक (DRG) आता ३१ जुलै ते ५ सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यभरातील ३.३७ लाख शिक्षकांना क्लस्टर आणि ब्लॉक स्तरावर प्रशिक्षण देणार आहेत. राज्य संसाधन गट (SRG- State Resource Group) यांच्याकडून कडून मिळालेल्या प्रभावी प्रशिक्षणामुळे शिक्षक (जिल्हा संसाधन गट) मूल्यवर्धन ३.० कार्यक्रम शाळांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
‘मूल्यवर्धन ३.०’ हा कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy - NEP 2020), राष्ट्रीय शैक्षणिक कृती आराखडा २०२३ (National Curriculum Framework - NCF 2023) आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ यांच्याशी सुसंगत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १ लाख शाळांमधील ५ लाख शिक्षकांच्या माध्यमातून १ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत (1 crore students) या कार्यक्रमाची व्याप्ती पोहोचणार आहे. मूल्यवर्धन (Mulyavardhan) कार्यक्रमात जोडीचर्चा, गटचर्चा, सहयोगी खेळ अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थी विचार करतात, अनुभव घेतात आणि त्यांच्यात विविध अभिवृत्ती व कौशल्ये विकसित होतात. हा कार्यक्रम फक्त एक शिक्षणप्रक्रिया नसून, तो मूल्यांवर आधारित मूल्यशिक्षण (Value Education) चळवळ आहे.