Banner

मूल्यवर्धनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष शाळा भेटींना सुरुवात

ZPPS शाळा, श्रीरामपूर येथे प्रत्यक्ष वर्गनिरीक्षण करताना मूल्यवर्धनचे तज्ज्ञ प्रतिनिधी
(दिनांक : १२ नोव्हेंबर २०२५)
‘मूल्यवर्धन ३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना सहाय्य करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांनी नियुक्त केलेल्या राज्यातील जिल्हा व तालुका समन्वयकांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. या प्रशिक्षणानंतर कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रत्यक्ष शाळा पातळीवर सुरू झाली आहे.
‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने शाळा भेटींना सुरुवात झाली आहे. मूल्यवर्धनचे मास्टर ट्रेनर्स तसेच जिल्हा आणि तालुका समन्वयक शाळांना नियमित भेट देत आहेत. या भेटीत वर्ग निरीक्षण, शिक्षकांशी चर्चा, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद अशा विविध पद्धतींनी मूल्यशिक्षणाच्या उपक्रमांचे प्रत्यक्ष अवलोकन केले जाते.
शाळांना भेटी देऊन तसेच फीडबॅक देऊन मूल्यवर्धन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षणानंतर दिले जाणारे हे शाळा-भेटीचे मार्गदर्शन म्हणजेच शिक्षकांसाठीचा पोस्ट-ट्रेनिंग सपोर्ट असून, ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या व्यावसायिक अंमलबजावणीचा हा एक महत्त्वाचा घटक आहे.
‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट, टप्पे आणि मार्च २०२६ पर्यंतची ध्येये समजून घेणे, अहवाल प्रणाली अधिक मजबूत करणे, शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय वाढविणे तसेच तालुका व जिल्हास्तरावरील नियोजन आणि आढावा यंत्रणा प्रभावीपणे राबविणे, हे सर्व प्रयत्न यासाठी आहेत की शिक्षक वर्ग पातळीवर ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करू शकतील.