महाराष्ट्रात तब्बल १,९३,३७० शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण पूर्ण

केज येथील मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणात सहभागी झालेले बीड जिल्ह्यातील शिक्षक
डिसेंबरमध्ये सर्व शाळांमध्ये होणार ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणी
(दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५)
महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांतील ३५३ तालुक्यांमध्ये शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १,९३,३७० शिक्षकांनी सदरील प्रशिक्षण पूर्ण केले असून या शिक्षकांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
त्याचबरोबर आतापर्यंत राज्यातील ८०,४३३ शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील मराठी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ हा कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असून महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.