मूल्यवर्धन: विद्यार्थ्यांना संवेदनशील व मूल्याधिष्ठित नागरीकत्वाचे धडे!

मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या एका उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी
(दिनांक : २ डिसेंबर २०२५)
२०१५ पासून राज्यातील शासकीय शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. या वर्षीपासून शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवी या वर्गांसाठी हा कार्यक्रम नव्याने सुरू झालेला आहे. मूल्यवर्धन शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र शंकर लाड (विद्या मंदिर वालूर, केंद्र वारूळ, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी आपली भूमिका सदरील लेखातून मांडलेली आहे.

सध्याच्या बदलत्या सामाजिक आणि तांत्रिक युगात विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची भक्कम पायाभरणी करणे ही काळाची गरज आहे. शालेय वयातच संवेदनशीलता, सहकार्य, संयम, करुणा, आदर, स्वच्छता, वैज्ञानिकदृष्टी आणि लोकशाही मूल्यांची बीजे रुजवणे आवश्यक आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून ही बीजे विद्यार्थ्यांच्या मनात रूजत असून भारताच्या भावी पिढीसाठी हा उपक्रम एक शाश्वत पाऊल आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, कर्तव्य आणि नैतिक जाणीवा बिंबवण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मूल्यवर्धन. शासकीय व अनुदानित शाळांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्यांचा आदर, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि मानवी मूल्यांची रुजवण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मोलाची भूमिका बजावणार आहे.

नव्या शिक्षण धोरणास पूरक उपक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडवण्यावर भर देण्यात आला आहे. त्या उद्दिष्टाशी सुसंगत अशी ही मूल्यवर्धन योजना असून तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या जबाबदाऱ्या, नातेसंबंध,स्व:ची जाणिव आणि लोकशाही मूल्यांचे भान प्राप्त होणार आहे.

पहिली ते आठवीपर्यंत लागू

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या सहकार्याने राज्यभरातील शासकीय व अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे. प्रत्येक वर्गासाठी दर आठवड्याला दोन तास मूल्यशिक्षणाची तासिका घेतली जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तकंही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत.

मूल्यांची रुजवण कृती आणि संवादातून

या अभ्यासक्रमात स्वतःची जाणीव, वैयक्तिक जबाबदारी, सामाजिक भूमिका, नातेसंबंधांची समज, आणि वर्गनियमन या पाच मुख्य विभागांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे. एकूण १२ क्षेत्र व त्याअंतर्गत ४० ते ५० उपक्रम इयत्तेनुसार आखण्यात आले आहेत. गटचर्चा, कृती गीतं, कथा, भूमिका अभिनय, व्हिडीओ सत्रे, स्वाध्याय असे विविध माध्यम वापरून विद्यार्थ्यांच्या मनात मूल्यांची पक्की रुजवण केली जात आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांना पालकांचीही सक्रिय भागीदारी लाभणार आहे.

वर्गशिस्त व नैतिक शिक्षणाचा संगम

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वतः वर्गनियम बनवण्याची संधी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांत शिस्त, सहकार्य आणि स्वावलंबन वाढतो. शांततेचे संकेत, सकारात्मक संवाद, सहाध्यायी सत्रे आणि गटकार्य अशा पद्धतींनी वर्गात एक सकारात्मक व सुसंस्कृत वातावरण तयार होते. याशिवाय घरी पाल्यांसाठी ‘स्वाध्याय’ देऊन पालक-विद्यार्थी संवादाला चालना दिली जाणार आहे. त्यामुळे कौटुंबिक मूल्यसंस्कारांनाही बळ मिळणार आहे.

मूल्यांकने आणि फीडबॅकची व्यवस्था

प्रत्येक टप्प्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाते. त्यांच्या सहभागातून, कृतीतून आणि विचारमंथनातून त्यांच्या मूल्यवृत्तीत झालेल्या बदलाचा मागोवा घेतला जातो. शिक्षकांसाठीही प्रत्येक टप्प्यावर स्पष्ट मार्गदर्शन आणि सूचना पुरवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत शांतिलाल मुथ्था फाउंडेशनची यंत्रणा प्रत्येक तालूकानिहाय काम पाहणार आहे.

मुथ्था फाउंडेशनचा अनुभव

मुथ्था फाउंडेशनने २०१५ ते २०१९ या कालावधीत राज्यातील ६७,००० शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबवला आहे. या शैक्षणिक वर्षापासून हा कार्यक्रम नव्या स्वरूपात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये अधिक व्यापक पातळीवर राबवला जात आहे. प्रत्येक तालुक्यात समन्वयक नेमले असून शाळांशी थेट संपर्क ठेवून या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.



- राजेंद्र शंकर लाड,

मुख्याध्यापक, विद्या मंदिर वालूर, केंद्र वारूळ, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर