Banner

मूल्यधिष्टीत शिक्षणातून घडणारी ‘संवेदनशील’ पिढी!

मूल्यवर्धन- जि.प.प्रा.शाळा, कलमठ- गावडेवाडीचे विद्यार्थी
महाराष्ट्र : (दिनांक : ५ जानेवारी २०२६)

मूल्यधिष्ठित शिक्षणातून मुलांच्या मनात करुणा, सहवेदना आणि माणुसकी कशी रुजते, याचा हृदयस्पर्शी अनुभव सहशिक्षिका सौ. रश्मी रामचंद्र आंगणे यांनी आपल्या शब्दांत मांडला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कलमठ गावडेवाडी (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील त्यांच्या वर्गातील हा छोटासा प्रसंग मूल्यवर्धन कार्यक्रमाचे सामर्थ्य उलगडून दाखवतो.

सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षापासून आमच्या शाळेत मूल्यवर्धन हा कार्यक्रम सुरू झाला. आठवड्यातील दोन तासिका खास या उपक्रमासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सुरुवातीला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नवा होता, पण हळूहळू तो त्यांच्या मनात रुजत गेला आणि आम्हालाही कल्पनेपलीकडचे अनुभव देऊ लागला.

असाच एक दिवस इयत्ता तिसरीच्या वर्गात आनंदी आणि दुःखी भावना या विषयावर मूल्यवर्धन तासिका सुरू होती. गोष्टी, प्रश्न, चर्चा यांमधून उपक्रम छान रंगत होता. मुलांचा उत्साह, सहभाग पाहून मन आनंदाने भरून येत होतं.

चर्चेतील एक प्रश्न असा होता, “मारियाच्या हातून कावळ्याने केकचा तुकडा नेल्यानंतर पुढे काय घडलं असेल?”

माझ्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी उत्तरं दिली, “ती आईकडे गेली असेल.”

“तिने परत केक मागितला असेल.”

“दादाकडून भांडून केक घेतला असेल.”

सगळी उत्तरं बालसुलभ, गोड होती.

तेवढ्यात वर्गातला एक शांत  बसलेला एक मुलगा  उभा राहिला. तो म्हणाला, “मॅडम… तो कावळा केक घेऊन उडत उडत आपल्या घरट्यात गेला असेल. त्याच्या पिल्लांना दोन दिवस काहीच खायला मिळालं नसेल. ती उपाशी असतील. त्याने तो केक आपल्या पिल्लांना भरवला असेल. त्यांचं पोट भरलं असेल.ते पाहून मारियाला आनंद झाला असेल."

क्षणभर वर्ग शांत झाला.आणि त्या शांततेत माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं.एवढ्या लहान वयात, एका केकच्या तुकड्यातून एका मुलाने माणुसकी, करुणा आणि प्राणीमात्रांविषयीचं प्रेम किती सहज मांडलं होतं!

त्या क्षणी जाणवलं, मूल्यवर्धन म्हणजे फक्त उपक्रम नाही, तो मुलांच्या मनात संवेदनशीलतेची बीजं पेरतो आहे.आजची ही मुलं नात्यांचा विचार करतात, दुसऱ्यांच्या भुकेची जाणीव ठेवतात, आणि एका कावळ्यालाही फक्त 'पक्षी' न मानता बाबा म्हणून पाहतात.

या उत्तरातून त्या विद्यार्थ्याची करुणा, सहवेदना व प्राणीमात्रांविषयीची आपुलकी स्पष्टपणे दिसून आली. या प्रसंगातून मूल्यवर्धन उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या मनावर होत असलेला सकारात्मक परिणाम अधोरेखित झाला. विद्यार्थी अधिक संवेदनशील, सहृदय व मूल्यजाणीव असलेले नागरिक घडत असल्याचे या अनुभवातून स्पष्ट होते. अशा प्रकारचे अनुभव मूल्यवर्धन कार्यक्रमाचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित करतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ बौद्धिक नव्हे, तर भावनिक व नैतिक विकास साधला जात आहे.

हा एक छोटासा प्रसंग होता, पण तो आमच्यासाठी फार मोठा धडा देणारा ठरला. अशा मूल्यांनी मुलं घडवणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम राबवणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, त्यांचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण आज एका केकच्या तुकड्याने एका वर्गात माणुसकीचं पोट भरलं होतं.

सौ. रश्मी रामचंद्र आंगणे
उपशिक्षिका, जि. प. प्रा. शाळा कलमठ- गावडेवाडी,
ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग