गप्पा मारूया, सारे शिकूया!

वर्गातील सहयोगी शिक्षणाचा एक प्रसंग (AI Photo)
महाराष्ट्र : (दिनांक : ८ जानेवारी २०२६)

प्रस्तावना :  मूल्यवर्धन उपक्रमांतील सहयोगी अध्ययन पद्धतींनुसार मुले गटात काम करता करता कितीतरी लोकशाही मूल्ये सहजपणे रुजू शकतात. याची जाणीव शिक्षक बंधु-भगिनींना, शालेय व्यवस्थापन समितीला कशी करून देता येईल याची दिशा या लेखात मिळेल. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी ही सहयोगी अध्ययन प्रक्रिया उलगडण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा एक काल्पनिक प्रसंग वापरला आहे. 

गप्पा मारुया, मोठे होऊया  
पाचगाव केंद्रशाळेत आज मूल्यवर्धन प्रशिक्षण होतं. नवीन भरती झालेले 40 प्राथमिक शिक्षक मोठ्या हॉलमध्ये बसले होते. एका पोस्टरवर करूया मूल्यांचा आदर, संविधानाचा जागर अशी घोषणा होती. या गोष्टी लहान मुलांना कशा समजणार, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला होता. तेवढ्यात मार्गदर्शक लोहार गुरुजी आले. मूल्यवर्धन सत्राला सुरुवात झाली.  

उपक्रम : मी कोण होणार? चे प्रास्ताविक  
तिसरीची मुलं मूल्यवर्धन पुस्तिका घेऊन आली. समोर बसली. गुरुजींनी सांगितल्यावर मुलांनी ‘आम्ही होणार सुपरस्टार’ ही कविता हावभावासहित म्हटली. मग गुरुजींनी ‘डोंगराला आग लागली पळा पळा’ हा खेळ घेऊन मुलांच्या जोड्या केल्या आणि त्यांना जोड्यात बसवलं.

चर्चा करूया
मग गुरुजींनी मुलांना मूल्यवर्धन पुस्तिकेतला मी कोण होणार? या उपक्रमाचे पान उघडून त्यावरची चित्रमाला पाहायला सांगितली. चित्रात मुलं मोठेपणी कोण होणार यावर बोलताना दिसली. भूमी ही मुलगी  मात्र गोंधळून आईशी बोलताना दिसली.

थोड्या वेळाने गुरुजींनी भूमी आणि आई एकमेकांशी काय बोलत असतील, यावर जोडीत चर्चा करायला सांगितलं. मुले छान गप्पा मारायला लागली. गुरुजी फिरून शंका सोडवत होते. बघणाऱ्या शिक्षकांना मात्र वाटतं होतं की गुरुजी अजून काहीच शिकवत नाहीयेत.  

सादरीकरण  
आता गुरुजींनी आई आणि भूमी यांची काय चर्चा झाली असेल’ ते एका जोडीला अभिनय करून दाखवायला सांगितले. ते बघताना मुलांना आणि शिक्षकांनाही मजा वाटली. गुरुजींनी विचारले, कुणाला अजून काही सांगायचे आहे का? बेबी म्हणाली, आई म्हणाली असेल की तू सारखी दंगा करतेस, खेळतेस. अशाने मोठी कशी होणार?” हे ऐकून सगळेच हसू लागले.

नंतर जोड्यांमध्येच बसून प्रत्येकाला 'मोठं झाल्यावर कोण होणार?' ते लिहायाला सांगितलं. मुलं विचार करू लागली. पोलीस, नर्स, डॉक्टर, शिक्षक असे शब्द कागदावर उमटू लागले.

संपूर्ण वर्गचर्चा  
मोठं झाल्यावर मी कोण होणार हे ठरवताना काय विचार केला?’ याविषयी सांगायला गुरुजींनी सांगितलं. ते सांगून झाल्यावर गुरुजी म्हणाले, “छान. इतक्या लहानपणी तुम्ही मोठा विचार करताय, पण नुसतं ठरवून चालेल का? विशालला मेस्सी सारख फुटबॉल खेळाडू व्हायचंय. त्यानं त्यासाठी काय करायला पाहिजे? विशाल म्हणाला, “गुरुजी, मी टीम करून रोज तासभर खेळणार.” गुरुजी म्हणाले, असा विचार आता प्रत्येकाने करायचा. चला, घरी गेल्यावर हे सगळं आई बाबांना सांगा.” अशाप्रकारे उपक्रम तासिका संपली.  

शिक्षकांच्या प्रतिक्रिया
समोरच्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं.  मुलं एरवी अवघड विषयावर विचार करू शकतात ही किमया त्यांनी अनुभवली होती. लोहार गुरुजींनी विचारलं, हे का शक्य झालं? शिक्षकांची उत्तर येऊ लागली... “मुलं जोड्यात मोकळी झाली.” “सगळेजण सहभागी झाले.” “विश्वासच बसला नाही त्यांच्यात इतका आत्मविश्वास कसा आला.” “फार काही न सांगताच मुलं स्वतःच शिकली.” “लोकशाहीची रंगीत तालीमच वाटली. ही पद्धत तरी कोणती आहे?”

समारोप 
गुरुजी म्हणाले, आपण जोड्या, सहविचार, सादरीकरण आणि शेवटी एकत्रित चर्चेतून विचार आणखी पुढे नेणं या साखळीत उपक्रम गुंफला होता. मुलं आता जे बोलली, ते व्याख्यानातून शक्य होतं का? अशी चर्चा चार-चार मुलांच्या गटातही घेता येते. यालाच सहयोगी अध्ययन असं म्हणतात. यावर खूप संशोधन झालं आहे. 
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शिक्षक सहयोगी शिक्षणाचा नवा मंत्र देऊन वर्गाबाहेर पडले.