Banner

बेलदारवाडी शाळेतील शिक्षकाची ‘मूल्यवर्धन फाईल’ ठरतेय कौतुकास्पद!

बेलदारवाडीचे (जि. सांगली) शिक्षक राजाराम काटवटे यांची मूल्यवर्धन फाईल
महाराष्ट्र, (दिनांक: ९ फेब्रुवारी २०२६)

‘बेलदारवाडी’हीसांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात डोंगराळ भागात एक छोटी वाडी आहे. येथे पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील मूल्यवर्धन शिक्षक राजाराम काटवटे यांनी ‘मूल्यवर्धन फाईल’तयार केली आहे. सदरील फाइलमध्ये सन २०२५-२०२६ वर्षासाठी मूल्यवर्धन तासिकेत कोणते कोणते उपक्रम घेतले याची तपशीलवार नोंद ठेवतात. त्यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची सही असते. तसेच शेरा द्यायचा असल्यास त्यासाठीही एक स्वतंत्र कॉलम सोडलेला आहे.

एकूण सोळा पटसंख्या असलेल्या या शाळेत राजाराम काटवटे हे तिसरी व चौथीचे वर्गशिक्षक आहेत,तर मुख्याध्यापक तानाजी कदम हे पहिली व दुसरीचे शिक्षक आहेत. दोघांनीही नुकतेच तालुकास्तरावरील मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतले असून त्यानुसार ते शाळेत नियमितपणे मूल्यवर्धन तासिका घेतात.

वर्गावर घेतलेले सर्व मूल्यवर्धन उपक्रम फाइलमध्ये नोंद करून ठेवावेत,असे शिक्षक काटवटे यांना वाटते. तसेच सुरुवातीपासून कोणत्याही बाबींचे योग्य दस्तावेज व्हावे,म्हणून ते केलेले काम नीटनेटकेपणे फाईलींग करून जपून ठेवतात. शासकीय अधिकारी किंवा शाळा तपासणीसाठी कोणी आले तर आपण घेतलेले उपक्रम तपशीलवार नोंदवलेले असावे,म्हणून त्यांना ही कल्पना सुचली. यासाठी त्यांनी स्वत: फाइल डिझाईन व प्रिंट करून घेतली. दुसरी बाब म्हणजे ‘सातत्यपूर्ण मूल्यमापन उपक्रमाच्या धर्तीवर मूल्यवर्धन फाईल करावीशी वाटली’असेही शिक्षक काटवटे सांगतात.

शिक्षकाच्या मूल्यवर्धन फाईलची अनुक्रमणिका

जिल्हा परिषद शाळा बेलदारवाडी ता. शिराळा जि. सांगली- मूल्यवर्धन ३.०, इयत्ता : तिसरी 

अ.नं.- वार- दिनांक- घटकाचे नाव- सही- शेरा

१.१- सोमवार- १७/११/२०२५- आनंददायी वर्ग
१.२- शनिवार- २२/११/२०२५- नियमांचे पालन केले नाही तर
२.१- शनिवार- २७/११/२०२५- सुपरस्टार
२.२- शनिवार- २७/११/२०२५- कोण मी होणार?
२.३- शनिवार- ०६/१२/२०२५- अभ्यासाच्या सवयी
२.४- शनिवार- १३/१२/२०२५- आनंदी आणि दुःखी भावना
२.५- शनिवार- २०/१२/२०२५- इतरांना आपला राग का येतो?
२६.- शनिवार- १६/०१/२०२६- तीव्र जाणीव

शिक्षक जेव्हा जेव्हा वर्गात मूल्यवर्धन तासिका घेतात,तेव्हा कोणता घटक घेतला याची तपशीलवार नोंद ते करतात. अनुक्रमणिकेच्या पुढील पानांवर दिनांक, वार, वर्ग तसेच विभाग व घटकाचे नाव याची नोंद होते. त्यानंतर ते सविस्तरपणे ‘शिक्षक कृती’लिहितात. दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी ‘स्वजाणीव’विभागातला ‘सुपरस्टार’हा उपक्रम घेतला. त्यानुसार त्यांनी लिहिलेली ‘शिक्षक कृती’अशी आहे. त्या खाली वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांची सही आहे.

*सुपरस्टार गाणे मुलांकडून म्हणून घेणे
*मुलांच्या जोड्या तयार करणे
*'लिहूया' कृती प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेणे.
*गटामध्ये/जोडीमध्ये स्वतःबद्दलची माहिती सांगायला लावणे
*काही गटांचे सादरीकरण करून येणे.

मुळातच काटवटे हे उपक्रमशील शिक्षक आहेत. कोरोना काळापासून त्यांनी ‘जि. प. शाळा,मानकरवाडी’हा ब्लॉग तयार केला होता. यावर ते मराठी,इंग्रजी शब्द,गणित या विषयवारील मुलांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य टाकतात. तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव चाचण्या पोस्ट करतात. बेलदारवाडी शाळेत बदली झाल्यानंतर त्यांनी ‘माझी मराठी शाळा’हा नवा ब्लॉग तयार केला आहे. आता यावर ही ते विविध उपयुक्त माहिती टाकत असतात.

एकंदरीत मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल शिक्षक उत्साही असून त्यांना आपल्या कामाचा मनापासून आनंद वाटतो. केलेल्या फाईलींगच्या कामामुळे त्यांच्या चेहर्‍यावर समाधान झळकते. अशा छोट्या पण महत्त्वाच्या उपक्रमांतून शिक्षकांचे मूल्यवर्धन कार्यक्रमांविषयी असलेला जिव्हाळा दिसून येतो. नियोजनबद्ध नोंदी, सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी सहभागामुळे बेलदारवाडी शाळेतील मूल्यांची रुजवणूक अधिक सक्षमतेने होताना दिसते.