![]() |
| उपशिक्षिका व DRG केतकी संखे आणि विद्यार्थी... |
जि. प. शाळा धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथील शाळेच्या उपशिक्षिका तसेच मूल्यवर्धनच्या जिल्हा संसाधन सदस्य (DRG) केतकी संखे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ दरम्यान त्यांच्या शाळेचा मूल्यवर्धन ३.० च्या अंमलबजावणीचा अहवाल तयार केला आहे. हा संपूर्ण अहवाल खाली सादर करत आहोत, जरूर वाचा...
शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे, तर सुसंस्कारित मन घडवणे होय. 'राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र' आणि 'शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन' यांच्या वतीने राबवण्यात येणारा 'मूल्यवर्धन' कार्यक्रम माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घेऊन आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ५ वीच्या वर्गात हा उपक्रम राबवताना मला आणि माझ्या ३२ विद्यार्थ्यांना जे अनुभव आले, ते खरोखरच विलक्षण आहेत. हा उपक्रम शाळेत २०१९ पासून सातत्याने राबवण्यात येत आहे. हा केवळ एक अभ्यासक्रम नसून जगण्याची एक नवी दृष्टी देणारा प्रवास आहे.
मूल्यवर्धन प्रशिक्षण आणि उपक्रम पुस्तिकेतील नावीन्य
या उपक्रमाच्या सुरुवातीला झालेल्या प्रशिक्षणातून मला या विषयाची व्याप्ती समजली. पुस्तकातील घटकांची मांडणी अत्यंत आकर्षक आणि विद्यार्थ्यांच्या वयाला साजेशी आहे. पुस्तकातील चित्रे, छोटेखानी कृती आणि संवाद यामुळे मुले या विषयाकडे आनंदाने ओढली गेली. यामध्ये केवळ शिक्षकांनी बोलायचे नसून विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायचे आहे, हे तत्त्व आम्हाला खूप भावले. वर्तुळ चर्चा, भूमिका अभिनय आणि जोडीने करावयाच्या कृतींमुळे वर्गातील नीरसता पूर्णपणे निघून गेली.
वर्गनियमः शिस्त नव्हे, तर लोकशाहीचा अनुभव
वर्गाची शिस्त लावण्यासाठी पूर्वी मला नियम सांगावे लागायचे. मात्र, 'मूल्यवर्धन'मधील 'वर्गनियम आणि परिणाम' या घटकामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचे नियम स्वतः तयार केले. 'वेळेत उपस्थित राहणे', 'इतरांचे बोलणे ऐकून घेणे' असे नियम मुलांनी स्वतः ठरवल्यामुळे त्याचे पालन करणे त्यांच्यासाठी सोपे झाले. नियमांचे उल्लंघन झाल्यास काय परिणाम होतील, हे देखील त्यांनीच ठरवल्यामुळे वर्गात एक प्रकारची 'स्वयंशिस्त' आणि लोकशाही वातावरण निर्माण झाले.
स्व-जाणीव आणि वैयक्तिक जबाबदारी
'स्व-जाणीव' या विभागात जेव्हा मुले 'माझी शाळा', 'माझे ध्येय' यावर बोलू लागली, तेव्हा माझ्या लक्षात आले की प्रत्येक मुलाकडे एक स्वप्न आहे. 'आपल्या विविध भावना' आणि 'अव्यक्त भावना' या घटकांमुळे मुलांनी आपले राग, लोभ आणि दुःख शब्दांत मांडायला सुरुवात केली. 'वैयक्तिक जबाबदारी' या विभागात आम्ही अभ्यासाच्या सवयी आणि ताण-तणाव यावर सखोल चर्चा केली. विशेषतः 'तणावमुक्तीसाठी दीर्घश्वसन' या कृतीने माझ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात खूप मदत केली. 'घरातील धोके' आणि 'सुरक्षित प्रवास' या मुद्द्यांमुळे मुले आपल्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक झाली आहेत. 'वचनाचा भंग' केल्यावर होणारी टोचणी त्यांनी बोधकथांमधून समजून घेतली.
नातेसंबंध आणि सामाजिक जबाबदारी
आमच्या शाळेतील मुलांमध्ये कौटुंबिक ओढ उपजतच असते, पण 'नातेसंबंध' या विभागामुळे त्यांना 'आदरयुक्त संवाद' आणि 'क्षमा मागणे' याचे महत्त्व समजले. 'दुखावणारे मित्र' या कृतीतून मित्रांमधील मतभेद कसे मिटवावेत, हे मुले शिकली. चपाती आणि भाजी मधील गमतीशीर संवादातून मुलांनी अन्नाचे महत्त्व आणि अन्नाची नासाडी टाळण्याचे संस्कार घेतले. लिंगभाव धारणा आणि महिलांचे नेतृत्व हे घटक ग्रामीण भागात मुला-मुलींमधील भेद कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. माझ्या वर्गातील मुले आता घरकामात आईला मदत करणे किंवा मुलींनी नेतृत्व करणे याकडे सकारात्मकतेने पाहतात. सामुदायिक स्वच्छतेमध्ये 'घरातील कचरा' आणि 'स्वच्छता' या उपक्रमांमुळे आमच्या शाळेचा परिसर आता अधिक स्वच्छ दिसू लागला आहे.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल
- सकारात्मक दृष्टिकोनः मुले आता संकटांकडे एक संधी म्हणून पाहू लागली आहेत.
- परस्परांना समजून घेणेः वर्गात भांडणे कमी झाली असून एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढली आहे.
- इतरांच्या मतांचा आदरः 'माझेच खरे' म्हणण्यापेक्षा 'दुसऱ्याचे म्हणणे काय आहे', हे ऐकून घेण्याची सहनशीलता मुलांमध्ये विकसित झाली आहे.
- मूल्यांची रुजवणूकः प्रामाणिकपणा, सहकार्य आणि कृतज्ञता ही मूल्ये त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसू लागली आहेत.
शालेय वातावरणात झालेला बदल आणि माझा वैयक्तिक विकास
'मूल्यवर्धन' कार्यक्रमामुळे आमच्या शाळेचे वातावरण अधिक आनंददायी झाले आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील अंतर कमी होऊन एक मैत्रीपूर्ण नाते तयार झाले आहे. एक शिक्षिका म्हणून माझा देखील वैयक्तिक विकास झाला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निकाल जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्यांचा भावनिक विकास महत्त्वाचा आहे.
‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ आणि ‘शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन’ यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. या उपक्रमामुळे माझ्या धाकटी डहाणू शाळेतील ही चिमुकली पावले उद्याचे जबाबदार नागरिक बनण्याच्या दिशेने खंबीरपणे पडत आहेत. हा प्रवास असाच निरंतर सुरू राहील, हा आमचा विश्वास आहे.
धन्यवाद !
![]() |
सौ. केतकी केतन संखे उपशिक्षिका व DRG, जि. प. शाळा धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर |




