Banner

महाराष्ट्राच्या मूल्यशिक्षणातील यशस्वी कार्यक्रम ‘मूल्यवर्धन’ : मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

सामंजस्य करार प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री श्री. दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड तथा अन्य मान्यवर
मुंबई : महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात विद्यार्थीकेंद्रित, ज्ञान रचनावादावर आधारित पहिलीपासून यशस्वीपणे राबविला जाणारा मूल्यवर्धन कार्यक्रम आता राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये राबविला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात या संदर्भातील महत्त्वपूर्ण ‘सामंजस्य करार’ सह्याद्री अतिथीग्रह, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री श्री. दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रंजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. श्रीकर परदेशी, शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचे ट्रस्टी श्री. वल्लभ भन्साली, संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, पंचशील उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. अतुल चोरडिया, बीजेएसच्या एमडी कोमल जैन, सीईओ व्ही. व्यंकटरमणा, टी. जयराजन आदी मान्यवर उपस्थित होते.

यानुसार मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत राबविण्याचा निर्णय घेतला असून १ लाख शाळांमध्ये, ५ लाख शिक्षकांच्या मदतीने, १ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाची व्याप्ती पोहोचणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन राज्य शासनाला सहकार्य करणार आहे.

‘महाराष्ट्राच्या मूल्यशिक्षणातील २०१५-२० अशी सलग पाच वर्षे जिल्हा परिषदेच्या सर्व ६७ हजार प्राथमिक शाळांमध्ये ४४ लाख विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम शासनाने यशस्वीपणे राबविला आहे. केंद्र शासनाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० आणि राष्ट्रीय शैक्षणिक कृती आराखडा- २०२३ यात शैक्षणिक क्षेत्रात नवी क्रांती घडवण्याची ताकद आहे. याच्याशी सुसंगत मूल्यवर्धन नव्या रूपात सिद्ध झाले आहे. पुढील पाच वर्षात हा कार्यक्रम देशातील मूल्यशिक्षणाला दिशा देईल, असा मला ठाम विश्वास आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य एक प्रगतीशील राज्य असून मूल्यवर्धनच्या माध्यमातून सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, विद्यार्थी, पालक हे एकत्रितरित्या मिळून महाराष्ट्रामध्ये मूल्यशिक्षणाची शैक्षणिक क्रांती घडवतील आणि महाराष्ट्र हे देशात सर्वात पुढे राहील, यात शंका नाही,’ असा विश्वास श्री. शांतिलाल मुथ्था यांनी आपल्या सादरीकरणात व्यक्त केला.