![]() |
जि. प. शाळा चिंचघर, केंद्र- कुडूस, ता- वाडा, जि- पालघर या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक |
या घडीला आपण विचार केला, तर देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. मग ते चोर्या, मारामाऱ्या किंवा बलात्कार असे असंख्य उदाहरणे असतील. यामध्ये प्रौढ गुन्हेगाराबरोबरच बाल गुन्हेगारीचे प्रमाणसुद्धा काही कमी नाही. हे कुठेतरी बदलायला हवे. हे जर बदलायचे असेल, तर आज या देशाला मूल्यशिक्षणाची नक्कीच गरज आहे. ती एक काळाची गरज निर्माण झाली आहे. कारण आजच्या शिक्षण पद्धतीला मूल्यवर्धन कार्यक्रमाची जोड मिळाली, तरच आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक होईल, यात मात्र शंका नाही.
आपण जर समाजाचा विचार केला, तर असे लक्षात येते, की सुजाण नागरिक घडणे हे ‘संस्कार आणि संगत’ यावर अवलंबून असते. परंतू, आपण जेव्हा याचा बारकाईने विचार केल्यास असे जाणवते की, एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतलेल्या दोन मुलांमध्येसुद्धा विसंगती आहे. एक मुलगा आज्ञाधारक, तर दुसरा गुन्हेगारी प्रवृत्तीचा. असे का? दोन्हींना मिळणारे संस्कार सारखे, दोघांचा समाज तसेच मित्रपरिवार सारखाच, तरी सुद्धा दोघांमध्ये इतकी विसंगती का? ही बाब एक विचार करण्यासारखी नाही का? मुलांची जडणघडण ही फक्त ‘संस्कार आणि संगत’ यांवर अवलंबून असते का? तर नाही; मुलांची किंवा माणसाची जडणघडण ही त्याच्या विचारांवर अवलंबून असते. चांगले काय आणि वाईट काय, याचा विचार करण्याच्या कुवतीवर अवलंबून असते. म्हणजेच त्याचा दृष्टीकोन हा फार महत्त्वाचा घटक असतो. आपल्याला त्याचा कोणत्याही गोष्टींकडे बघण्याचा चांगला दृष्टीकोन त्याच्यात निर्माण करावयाचा असेल, तर मूल्यशिक्षणाची नितांत गरज आहे, तीही शिक्षणाच्या प्राथमिक स्तरापासूनच. तरच त्यावर उभी राहणारी इमारत टिकेल, नाहीतर पायाच कच्चा राहिला, तर ते शक्य होणार नाही. म्हणजेच आजचा बालक उद्याचा सुजाण नागरिक घडवायचा असेल, तर कुटुंब, समाज तसेच मित्र यांना दोष देत बसण्यपेक्षा शालेयस्तरावर मुलांमध्ये मूल्ये रुजवून त्यांच्यात सुविचार करण्याची कुवत निर्माण करणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. अर्थात हे पवित्र कार्य फक्त शिक्षकच करू शकतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असला, तरी शिक्षणाला मूल्यांची, शिलाची जोड असावी लागते. तरच ते शिक्षण समाजोपयोगी होऊ शकते, अन्यथा त्याच शिक्षणाचा उपयोग समाजाचा तसेच देशाचा घात करण्याठीसुद्धा होऊ शकतो.’
खरंच मित्रांनो, शांतीने आणि समृद्धीचे जीवन जगायचे असेल, तर आजच्या पिढीला मूल्यशिक्षणाची म्हणजेच मूल्यवर्धन कार्यक्रमाची नितांत गरज आहे.
- श्री. गणेश शंकर गावित
जि. प. शाळा चिंचघर,
केंद्र- कुडूस, ता- वाडा, जि- पालघर