Banner

‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षणाचा प्रेरणादायी अनुभव!

नांदेड जिल्हा मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणात सहभागी झालेले शिक्षक
नुकतेच नांदेड येथे जिल्हास्तरीय मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झालेले साहेबराव शेळके (मुख्याध्यापक, स्वामी रामानंद तीर्थ प्रा.शा., नवा मोठा, त्रिरत्ननगर-सांगवी, नांदेड) यांनी या मूल्यवर्धन प्रशिक्षणासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, शांतीलाल मुथा फाऊंडेशन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांच्यामार्फत आयोजित जिल्हास्तरीय मूल्यवर्धन ३.० सुलभकांचे चार दिवसीय प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे नुकतेच संपन्न झाले. ९ ऑक्टोबर २०२५ प्रशिक्षणाचा पहिला दिवस सुरु होण्याच्या काही तासांआधी पावसाची जोरात रिपरिप चालू होती. पावसाच्या सरीवर सरी सुरू होत्या. सगळीकडे पाऊसच पाऊस! प्रशिक्षण होईल की नाही, याची मनात शंका होती. प्रशिक्षण सुरू होणारच नाही, असा अंदाज घेऊन निघालो. तरीसुद्धा प्रशिक्षण सुरू झाले तर तयारी असावी म्हणून आवश्यक त्या साहित्यासह अंगात रेनकोट चढवून गाडीवर प्रशिक्षणस्थळाच्या दिशेने सुसाट निघालो.

प्रशिक्षण स्थळी पोहोचताच चार-पाच जण दिसून आले. यांपैकी एक-दोन ओळखीचे होते. एक-एक करून प्रशिक्षणार्थी येत होते. एव्हाना पाऊस थांबला होता. आकाशही निरभ्र असल्याचे दिसून येत होते. सकाळचे १०.३० वाजून गेले. आयोजक उपस्थितीची नोंद रेकॉर्डवर घेत होते. काही जण व्हरांड्यात फिरत होते. इतक्यात आदेश आला, “सर्वजण सभागृहात बसा.”

नांदेड महानगरपालिकेच्या शाळांतील आणि उमरी व नायगाव तालुक्यातील हळूहळू शंभर-सव्वाशे प्रशिक्षणार्थी हजर झाले. औपचारिकपणे उद्घाटन सोहळा सुरू झाला. उद्‌घाटन सोहळ्यात प्रशिक्षणाचे समन्वयक अर्थात मुख्याध्यापक प्रकाश शिरसे सर यांनी ‘सूचना दिली. ते म्हणाले, “सदरचे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. वेळेच्या बंधनासह नियमितपणे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे. निव्वळ हजेरीसाठी हे प्रशिक्षण नाही, तर मूल्यवर्धन कार्यक्रमाचा महत्त्वाचा टप्पा आहे.”

उद्घाटनानंतर दोन गट-वर्ग करण्यात आले. नांदेड महानगरपालिका कार्यक्षेत्र एक गट आणि उमरी व नायगाव तालुका शिक्षक दूसरा गट. मी पहिल्या गटात समाविष्ट होतो. हे प्रशिक्षण नाविन्यपूर्ण असेल असा अंदाजही आला होता. आमच्या गटाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिवकुमार पाटील सर, सतीश पाटील सर, माधव पचलीग सर, शोभा तोटावार मॅडम, संजय शेळके सर इ. विषयाचा परिपूर्ण अभ्यास असणारे प्रशिक्षक होते. एव्हाना त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना आपापला परिचय देऊन प्रशिक्षणाला सुरुवात केली.

सतीश पाटील सर यांनी वर्गनियमन करण्याच्या पायर्‍या, महत्त्वाच्या बाबी आणि सकारात्मक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले. माधव पचलीग सर यांनी मूल्यवर्धन पुस्तिका कशी वापरायची, सहयोगी अध्ययन, सहयोगी खेळ, सहयोगी अध्ययन योजना, वैशिष्ट्ये, तत्त्वे, टप्पे इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण अध्यापन केले. त्यानंतर शोभा तोटावार मॅडम यांनी आपल्या रसाळ वाणीने वर्गव्यवस्थापन, वर्गनियमन, कार्य शांतता संदेश, वर्गनियमनाचे परिणाम, मुक्तोत्तरी प्रश्न, पाठपुराव्याचे प्रश्न, वेटटाईम, आव्हाने हाताळणे या बाबत विविध व्हिडिओ आणि प्रत्यक्ष अध्यापनातून प्रशिक्षणार्थींमध्ये चर्चा घडवून आणण्यात यशस्वी झाल्या. आपल्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वातून शिवकुमार पाटील सरांनी शिक्षक सुलभक, अभिनय गीत, भूमिका अभिनय, मूल्यवर्धन अंतर्गत विद्यार्थी मूल्यांकन, वर्गात मूल्यवर्धन उपक्रमाचे आयोजन यावर विविध उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन केले. तर संजय शेळगे सरांनी मूल्यशिक्षणाचा परिचय, आज मूल्यशिक्षणाची गरज का? यासह मूल्यशिक्षणाचे विविध पैलू उलगडून दाखविले.

उपरोक्त सर्व विषय तज्ज्ञांनी सलग चार दिवस मूल्यवर्धन  प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना यात्रा-अध्यापन करून, अध्ययनार्थींचे मानसिक मनोबल वाढविण्याचे काम केले. यासह प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्व शंकांचे चर्चेच्या माध्यमातून समाधान करण्यात सर्व मार्गदर्शक यशस्वी झाले. त्यांची सामंजस्यपूर्ण आणि प्रश्नाला उत्तर देण्याची संयत भूमिका मनाला भावणारी होती. मूल्यवर्धन  प्रशिक्षणाच्या या चार दिवसांत मुख्याध्यापक प्रकाश शिरसे सर यांचा प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांवर कटाक्ष होताच. मूर्ति लहान पण कीर्ती महान असेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून दिसून आले.

शांतिलाल मुथा फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर नागेश बोडके सर यांनीही प्रशिक्षणादरम्यान आपल्या वक्तृत्वाची छाप सोडली. बहुवर्गीय, बहुभाषिक वर्गामध्ये मूल्यवर्धनचे संचालन करण्यासह तंत्र कसे वापरावे, या बाबत प्रशिक्षणार्थींना यथायोग्य मार्गदर्शन केले. ते दिसायला शांत, संयमी, पण अभ्यासू व्यक्ति आहेत. सुलभक कुठे अडकला किंवा चर्चा अवांतर होऊ लागली, की लगेच पुढे येऊन चर्चा ट्रॅकवर आणत. त्यांच्या हजरजबाबीपणामुळे तसेच प्रश्नांचे तत्काळ उत्तर मिळत असल्यामुळे प्रशिक्षार्थींना समाधान मिळाले.

मूल्यवर्धन  प्रशिक्षणाच्या चारही दिवसांत सर्व उपस्थितांसाठी आयोजकाकडून उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली. जेवणाचा बेत अगदी घरच्यासारखा होता.

या चार दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षार्थी अगदी भारावलेले दिसले. प्रशिक्षणादरम्यान अवगत केलेले अध्ययन आपल्या शाळेत गेल्यानंतर केव्हा केव्हा या उपक्रमाची सुरुवात करू, अशा प्रकारची सर्वांचीच भावना त्यांच्या देहबोलीवरून दिसून आली. ९ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणाचा समारोप शासकीय अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा औंढकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्वांना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रशिक्षार्थी प्रा. नितीन दारमोड यांनी केले, तर आभार डॉ. माणिक गाडेकर यांनी मानले.

एकंदरीत, मूल्यवर्धन प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी आपापल्या शाळेत मूल्यवर्धन वर्ग उपक्रम प्रभावीपणे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये व संबंधित क्षमता विकसित केली. तसेच, त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि मूल्यवर्धन उपक्रमातील पद्धती इतर विषयात कशी वापरता येईल, याबाबतचे हे महत्वाचे प्रशिक्षण असल्याचे प्रशिक्षणाच्या चार दिवसांच्या अध्ययनावरून लक्षात आले. हा अनुभव माझ्यासाठी नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी होता.