![]() |
| जि. प. शाळा, झेंडेवाडी येथील विद्यार्थाने लिहिलेली सुंदर कविता |
मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, आत्मविश्वास आणि विचार करण्याची क्षमता विकसित होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमातून तिसरीच्या विद्यार्थ्याच्या कवितेतून हे प्रभावीपणे समोर आले आहे. मग त्याचे शिक्षक-पालकांकडून खूप खूप कौतुक झाले.
या शैक्षणिक वर्षापासून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन पुस्तिकाही पोहोचलेल्या आहेत. तसेच मूल्यवर्धन तासिकांनाही सुरुवात झालेली आहे. शिक्षक प्रशिक्षणानंतर यातील विविध उपक्रम प्रत्यक्ष वर्गात घेतले जात आहेत.
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातल्या झेंडेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झालेला आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत एकूण ६४ विद्यार्थी शिक्षण घेतात. इयत्ता तिसरीच्या उपक्रमांतील स्व-जाणीव यातील ‘सुपरस्टार’ हा उपक्रम तिसरीच्या शिक्षिका चित्रलेखा भिरूड यांनी वर्गामध्ये घेतला. त्यानंतर मुलांना घरी करावयासाठी एक छोटी पण महत्त्वपूर्ण कृती दिली. ‘स्वतःबद्दल एक छोटीशी कविता लिहा आणि ती घरातल्या व्यक्तींना वाचवून दाखवा’, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
तिसरीत एकूण ९ विद्यार्थी असून त्यातील चार विद्यार्थ्यांनी कविता लिहून घरी आणि मॅडमना दाखवल्या. तिसरीचा विद्यार्थी कृष्णा अमोल झेंडे यानेही स्वतःबद्दल खूप सुंदर अशी कविता केली होती. त्याने ती घरातल्या सर्वांना वाचून दाखवली आणि वर्गात शाळेत गेल्यावर मॅडमना वाचून दाखवली. कृष्णाची ती कविता सर्वांनाच खूप आवडली.
चित्रलेखा भिरूड ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका तथा पहिली, दुसरी व तिसरीच्या वर्गाशिक्षिका आहेत. त्यांना मूल्यवर्धन कार्यक्रमाची पहिल्यापासूनच आवड आहे. पूर्वीही त्या मूल्यवर्धन शिक्षिका म्हणून काम केले आहे. तसेच त्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवायला आवडते. यावर्षी त्यांनी मूल्यवर्धन प्रशिक्षण पूर्ण केले असून वर्गात नियमित मूल्यवर्धनचे उपक्रम घेतात. त्या म्हणतात, “शाळेच्या परिपाठाला सर्व शिक्षकांना सांगितले होते की, आपापल्या वर्गात उपक्रम घेऊन यामुळे मुलांना काहीना घरून करून आणण्यासाठी कृती द्या. यामुळे त्यांच्यात चुरस, निकोप स्पर्धा निर्माण होते.”या उपक्रमाविषयी शिक्षिका चित्रलेखा भिरूड म्हणतात, “स्व-जाणीव या उपक्रमाअंतर्गत कविता तयार करून आणायला सांगितल्यावर तिसरीच्या वर्गातील नऊपैकी चार मुलांनी स्वत:वर कविता करून आणल्या होत्या. यातून त्यांना स्वत:बद्दल समजतंय. ते विचार करत आहेत, हे लक्षात आले.”
कृष्णाने स्वत:वर लिहिलेली कविता अशी आहे...
उपक्रम : स्वत:बद्दल कविता
नाव : कृष्णा अमोल झेंडे
वर्ग : तिसरा
माझं नाव कृष्णा गोड आणि छान
हसत-खेळत करतो रोज नवं काम
चित्र काढायला धावायलाही भारी
माझी प्रत्येक सकाळ असते प्यारी
आई-बाबांचा लाडका मुलगा
शिकायची आहे मला खूपच ओढ
चूक झाली तरी हसतो मी
पुन्हा प्रयत्न रोज करतो मी
मी लहान आहे पण स्वप्नं मोठी
चांगला माणूस होणार नक्की
मी आहे खास सगळे म्हणतात
माझं नाव कृष्णा- मला ते आवडतं!
“विशेष म्हणजे कृष्णाचे आणि लिहिलेल्या कवितेचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवले. तसेच पालकांच्या ग्रुपला पाठवले. तेव्हा माझ्याही मुलाने अशा उपक्रमात भाग घेऊन काहीतरी केलं पाहिजे, असं त्यांना वाटतंय. आपल्या मुलांनी करावं, ही जाणीव यातून तयार होत आहे. तसेच मूल्यवर्धन उपक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.” असं चित्रलेखा भिरूड आवर्जून सांगतात.
या मूल्यवर्धन उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, सुसंवाद, स्व-मूल्यमापन या क्षमता विकसित होताना दिसून आल्या आहेत. तसेच सुंदर कविता लिहिल्याबद्दल कृष्णाचे शिक्षक आणि पालकांकडून खूप खूप कौतुक झाले.
%20(2).jpg)



.jpeg)
