![]() |
| शाळेत पालकांशी हितगुज करताना शिक्षक |
एससीईआरटीचे सेवानिवृत्त उपसंचालक तथा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे सल्लागार श्री. विद्याधर शुक्ल यांनी मूल्यवर्धन उपक्रमाच्या अनुषंगाने शाळा–पालक–विद्यार्थी यांच्यातील संवाद आणि सहभाग या विषयावर मांडणी केली आहे. शाळेत राबविण्यात येणारे मूल्यवर्धन उपक्रम केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता पालकांपर्यंत पोहोचले, तर मुलांच्या सर्वांगीण विकासाला अधिक बळ मिळते, ही भूमिका या लेखातून प्रभावीपणे मांडली आहे.
मनीषा पाटील या जिल्हा परिषद शिक्षिका मूल्यवर्धन उपक्रम नियमितपणे घेतात. या उपक्रमांमुळे मुलांचे विचार, भावना यात बदल व्हायला लागतात. हा परिणाम टिकण्यासाठी, अधिक प्रभावी होण्यासाठी पालकांची मदत मोलाची आहे, याची त्यांना चांगली जाणीव आहे. त्यामुळे आजच्या पालकसभेत ‘मूल्यवर्धन’ हा एक विषय ठेवला आहे.
मूल्यवर्धन म्हणजे काय? उपक्रम म्हणजे काय? मुलांना आणि पालकांना त्याचा फायदा काय होणार या विषयी शिक्षणाची औपचारिक भाषा न वापरता सोप्या भाषेत मांडणी करावी असं नियोजन केलं.
दुसरं म्हणजे भावनिक विकासाचा तात्विक भाग तूर्त बाजूला ठेवला. त्याऐवजी मुलांना चांगलं वळण लावताना पालकांना येणाऱ्या अडचणी कोणत्या? त्यावर मूल्यवर्धन कसं उपयोगी आहे? हे पटवून देणं ही चांगली सुरुवात होऊ शकेल, असं त्यांना वाटलं. ही सभा कशी झाली? चला त्याची रूपरेखा वाचूया.
पालकसभेत प्रास्तविक
मनीषाताई: नमस्कार. मुलांकडून ‘मूल्यवर्धन’ हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. मुलं शाळेत उपक्रमात काहीतरी करायला सांगितलंय म्हणून तुमचे अनुभव विचारत असतील, शेजारून काही माहिती घेत असतील. मूल्यवर्धन नेमकं काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना! त्याचं थोडं सविस्तर उत्तर आपण पाहूया.
पालकांना मुलांबद्दलच्या अपेक्षा विचारूया
मनीषाताई: तुमची मुलं मोठी झाल्यावर कशी व्हावीत असं तुम्हाला वाटतं?
पालकांची उत्तरं: चांगलं शिकावं, हुशार व्हावं, चांगला नोकरीधंदा करावा. याशिवाय त्याचं आरोग्य उत्तम असावं, स्वभावात माणुसकी असावी, चांगल्या सवयी लागाव्यात इत्यादी.
मनीषाताई: शाळा याच अपेक्षा ‘मुलाची बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक अशी सर्व बाजूंनी प्रगती व्हावी” या शब्दात सांगते. यातली ‘मानसिक प्रगती’ घडणं म्हणजे ‘मुलांना चांगल वळण लावणं’ हे एक मोठं आव्हान असतं नाही का? मुलं वाढवताना तुमची धावपळ होते. तुम्हाला घरी वळण लावताना नेहमी कोणत्या अडचणी जाणवतात जरा सांगता का?
पालकांचा प्रतिसाद: काय करावं हेच कळत नाही ताई. बघाना
पानात टाकतात. सारखं गोड लागतं खायला.
मोठी झाली तरी दप्तर आवरावं लागतं.
सारखी मोबाईलवर असतात. धड अभ्यास नाही, की मदत नाही, की खेळ नाही!!!
उध्दटपणे वागतात.
फार रहदारी आहे. रस्ता नीट ओलांडतायत का? घोर लागतो!
मूल्यवर्धनकडे याची उत्तरं आहेत का?
मनीषाताई: या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांची दिशा आपल्याला मूल्यवर्धनमधून मिळते. अशी काय जादू आहे? एक उदाहरण पाहूया.
तुमचा नंदू दिवसभर मोबाईलवर असेल तर तुम्ही काय करता? परत परत सांगता, रागावता, हातातून ओढून घेता, धपाटाही देता. तरी नंदू नाही जुमानत. मूल्यवर्धनच्या तासाला यासाठी उपक्रम कसा घेतात ते सांगते.
मूल्यवर्धन उपक्रम: एक उदाहरण समजावून सांगूया
मनीषाताई: नंदूचे शिक्षक यापैकी काहीही करत नाहीत. एका उपक्रमात ते मोबाइलवर मुलं काय काय करतात याची उदाहरणं मूल्यवर्धन पुस्तिकेत वाचायला सांगतात. मग मुलं जोड्याजोड्यात बसतात. असं वागण्याचा मुलांच्यावर काय परिणाम होईल? मोबाइलवरचा वेळ कमी कसा करायचा? यावर चर्चा करायला सांगतात. नंदू जोडीत विचार करतो. मग वर्गात सगळे मिळून चर्चा करतात. शेवटी यावरची उपाययोजना मुलं आणि शिक्षक मिळून ठरवतात.वर्षभर असे उपक्रम सुरु असतात.त्यावेळी मुलं विचार करतात. मनाला पटतात ते उपाय मुलंच ठरवतात. त्यामुळे ते पाळण्याची शक्यता वाढते.
पालक प्रतिसाद: हे आम्हाला नवीनच समजलं. यात मुलं चर्चा करतात. विचार करतात. त्याचं त्यांनाच समजतं मोबाईल सारखा बघणं वाईट आहे.
मूल्यवर्धन उपक्रमातून होणारे बदल
मनीषाताई: तेच तर मी सांगते. प्रत्येक इयत्तेसाठी असे उपक्रम आहेत. ते करता करता मुलं घरात मदत करायला शिकतात. वेळेचं नियोजन करतात,अभ्यासाच्या सवयी लागतात.लहानपणीच आपले गुण ओळखून मोठेपणी कोण होणार ते सांगतात. आपल्या उणीवा ओळखून त्या दूर करण्याचे मार्ग शोधतात. घरी आणि बाहेर चांगली नाती कशी जोडावी आणि जपावी हे शिकतात. समाजात आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या याचं भान येतं. एक चांगला माणूस घडायला मदत होते. हेच तर हवं असतं ना आपल्याला?
पालक म्हणून काय काय करायचं?
पालक: आता यात आम्ही काय काय करायचं ते सांगा. आम्ही नक्की करू.
मनीषाताई: मूल्यवर्धन उपक्रमात घरी करायच्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात, त्या समजून घेऊन सहभागी व्हायचं. मुलांमधे बदल होताना त्यावर बोलायचं. जमले तर पुस्तिका वाचायच्या. आणि काही वेळा आपल्याही सवयी बदलायला लागतील बरंका!
मूल्यवर्धन उपक्रम करता करता आपली मुलं पुढे जबाबदार, एकमेकांची काळजी घेणारे आणि मूल्य जपणारे नागरिक होणार आहेत. आपल्या संविधानात हेच तर सांगितलं आहे. या बद्दल आपण बोलत राहणार आहोतच. सर्वाना धन्यवाद.
.png)