Banner

कल्पक-नाविन्यपूर्ण उपक्रमांनी ‘संविधान दिन’ साजरा; राज्यातील शाळांचा अभूतपूर्व प्रतिसाद!

विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारलेली अक्षरं (विकास विद्यालय विहीरगाव, ता. सावली जि. चंद्रपूर)
महाराष्ट्र : (दिनांक : ८ डिसेंबर २०२५)
एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा नाविन्यपूर्ण कल्पनांची जोड देऊन सर्वांच्या सहभागाने राबविला तर तो उपक्रम लोकप्रिय होतोच शिवाय त्याचा मुख्य उद्देशही साध्य होतो. असाच काहीसा अनुभव या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये राबविलेल्या संविधान दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. संविधानाशी संबंधित विविध ९ उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात हा दिवस शाळांमध्ये साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी सहकार्य केले.
संविधान दिन का साजरा केला जातो?
जगातील सर्वात मोठा लोकशाही शासन व्यवस्था असलेल्या भारतीय संघराज्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस महत्त्वपूर्ण मनाला जातो. त्यांचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान निर्मितीच्या मसूदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यानिमित्त २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

दुसरं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थही संविधान दिन साजरा केला जातो. डॉ. आंबेडकरांचे २५५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना भारत सरकारने त्यांना श्रद्धांजली अर्पण कण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत ‘संविधान दिन’ साजरा केला.

तेव्हापासून संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ रोजी आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
संविधानातील मूल्यांवर आधारित मूल्यवर्धन
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानातील मूल्यांवर आधारित ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रम तयार केला असून राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शासकीय कार्यक्रम म्हणून राज्य शासनाद्वारे राबविला जातो. 

केंद्र शासनाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२०, राष्ट्रीय शैक्षणिक कृती आराखडा- २०२३ आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा- २०२४ यांच्याशी सुसंगत असे ‘मूल्यवर्धन ३.०’ नव्या रूपात सिद्ध झाले. हा ‘मूल्यवर्धन ३.०’ कार्यक्रम राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत राबविण्याचा ऐतिहासिक सामंजस्य करार राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एप्रिल २०२५ मध्ये झाला.

पुढील पाच वर्षे (२०२५-२०३०) मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या ८७३७८ शासकीय व अनुदानित शाळांमधून, ३ लाख ६५ हजार शिक्षकांच्या सहभागाने तब्बल ९७ लाख २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाची व्याप्ती पोहोचणार आहे. या साठी मुथ्था फाउंडेशन शासनाला आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य करते.
SCERT च्या माध्यमातून संविधान दिन उपक्रम
या वर्षी ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे’ यांच्या आदेशाने राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबवून ‘संविधान दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संचालक डॉ. राहूल रेखावार यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकारी व शाळांना पत्र पाठवत हा उपक्रम साजरा करण्याचा घेतला होता. त्यात संविधानाचे महत्त्व, शाळांनी राबवायचे उपक्रम, राबवण्याची कार्यपद्धती सविस्तर दिली होती.

यानुसार शाळांनी संविधान दिनाची तयारी करत प्रभातफेरी, संविधानाचे वचन, चित्रकला, वकृत्व, प्रश्नमंजुषा, पथनाट्य, गीत, पोवाडा असे भारतीय संविधानाचा गौरव करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करणारे विविध उपक्रम राबवून राज्यातील शाळांनी सहभाग घेतला होता.
शाळास्तरावर राबविण्यासाठी दिलेले उपक्रम 
१. संविधान दिन प्रभात फेरी
२. संविधान व्याख्यानमाला/सेमिनार
३. चित्रकला व पोस्टर स्पर्धा
४. संविधान प्रश्नमंजुषा
५. संविधानावर आधारित पथनाट्य
६. पोवाडा / गीत सादरीकरण
७. मानवी साखळी निर्मिती
८. सेल्फी पॉईंट- ‘I Love Constitution’
९. हस्तकला स्पर्धा
दिलेल्या उपक्रमांपैकी कोणताही एक किंवा एकापेक्षा जास्त उपक्रम शाळांनी राबवायचे आहेत. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व, जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ होतील. अशा प्रकारे संविधान दिन हा फक्त औपचारिक न राहता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा जीवंत अनुभव देणारा दिवस ठरेल, अशा मार्गदर्शक सूचना शाळांना एससीईआरटीकडून देण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल 
“महाराष्ट्र शासन व ‘शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन’च्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यातील ७५,००० शासकीय शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात पथनाट्य ते संविधानसंबंधी प्रश्नमंजुषा यासारख्या कार्यक्रमांद्वारे संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन’ने लहान मुलांमध्ये अशा उपक्रमांद्वारे देशप्रेमाचे बीज पेरणे हे अभिमानास्पद आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत संविधान दिन साजरा केल्याबद्दल ‘शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन’ यांचे अभिनंदन.’ अशा प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून माहिती देत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
रिपोर्टिंग करत शाळांनी दिला अभूतपूर्व प्रतिसाद
संविधान दिनाच्या सर्वच उपक्रमांना शाळांनी भरभरून प्रतिसाद मिळाला दिला. विविध उपक्रम राबवून संविधान दिन साजरा केल्याचे शाळांनी रिपोर्टिंग केले आहे. ही माहिती भरण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने ऑनलाइन लिंक तयार करून शाळांना पाठवली होती.

या लिंकवर राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३९८ तालुक्यांतील तब्बल २४,७६४ शाळांनी फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून पाठवले आहेत. यानुसार १ लाख ३७ हजार १० शिक्षक आणि ३३ लाख, ३६९ विद्यार्थी सहभागी झाले होते. असा अभूतपूर्व प्रतिसाद रिपोर्टिंग करणार्‍या शाळांचा लाभला आहे. विशेष म्हणजे कोणता उपक्रम साजरा केला, त्याला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकंदरीत समाजाचा घटकाचा कसा प्रतिसाद मिळाला, अशी सर्व एकत्रित माहिती शाळांनी लिंकद्वारे भरून पाठवली आहे.
उपक्रमांतील नाविन्य आणि कल्पकता
संविधान दिनानिमित्त साजरे केलेले विविध उपक्रम लक्षात घेतले, तर शाळांनी साजरे केलेल्या उपक्रमांतील नाविन्य आणि कल्पकता ठळकपणे दिसून येते. यात ५०७० शाळांनी ‘सेल्फी पॉईंट’ तयार केले होते. तिथे विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांनीही सेल्फी घेतल्या. दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हस्तकला स्पर्धा. ३७२८ शाळांनी ‘हस्तकला स्पर्धा’ घेऊन विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यासपीठ दिले.
विशेष म्हणजे १९६५ शाळांनी ‘पथनाट्य’ हा उपक्रम घेऊन संविधानाचा खर्‍या अर्थाने जागर केला. तसेच ४८५१ शाळांनी ‘मानवी साखळी’ करून संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. देशाची एकता व अखंडता याचा प्रत्यक्ष अनुभव मानवी साखळीतून विद्यार्थी व सहभागींनी घेतला.

५२८१ शाळांनी ‘पोवाडा व गाणी सादरीकरण’ करत संविधानाचा गौरव केला. ७१३३ शाळांनी ‘व्याखानमाला/सेमिनार’, ८०६१ शाळांनी ‘प्रश्नमंजुषा’, १४९७६ शाळांनी ‘चित्रकला व पोस्टर स्पर्धा’ आणि तब्बल १६९८१ शाळांनी ‘प्रभात फेरी’ काढून संविधान दिनाचा मोठा उत्सव साजरा केला. तसेच ४४९७ शाळांनी ‘इतर विविध उपक्रम’ राबवून संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळांनी साजरे केलेले हे नाविन्यपूर्ण व कल्पक उपक्रम नक्कीच कौतुकास्पद होते. शाळांच्या, शिक्षकांच्या या कामगिरीला सलाम करावा असेच त्यांनी काम केले आहे.
या उपक्रमासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे टीसी, डीपीसी यांनी आपापल्या जिल्ह्यात शाळांशी समन्वय ठेऊन महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. तर शाळांच्या मुख्याध्यापक-शिक्षकांनी स्वत:ला झोकून देऊन हा उपक्रम साजरा करण्यासाठी मेहनत घेतली. शेवटी या कार्यक्रमाचे खरे हीरो ठरले हे सर्व तयारीनिशी संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालले विद्यार्थी! त्यांच्या सहभागाशिवाय हा उपक्रम यशस्वी झाला नसता.