Banner

मूल्यवर्धन उपक्रमातून बहुलतावादाची पायाभरणी

बहुलतावादाची संकल्पना आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रमातील त्याचे शैक्षणिक महत्त्व

महाराष्ट्र, (दिनांक: १६ फेब्रुवारी २०२६)

प्रस्तावना :

शिक्षणातून बहुलतावादाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवता येतील आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रम या प्रक्रियेला कसे बळ देतात, याचा सखोल वेध या लेखात घेतला आहे. शालेय स्तरावर विविधतेचा स्वीकार, सहिष्णुता आणि परस्पर आदरभाव विकसित करण्यासाठी उपक्रमाधारित शिक्षणाची भूमिका येथे स्पष्ट केली आहे. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी बहुलतावादाची संकल्पना आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रमातील त्याचे शैक्षणिक महत्त्व सोप्या उदाहरणांसह मांडले आहे.

शिक्षण धोरणात बहुलतावाद:

राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 च्या प्रास्ताविक प्रकरणात शिक्षण धोरणाची आखणी करताना आधारभूत मानलेली काही तत्त्वे नमूद केली आहेत (NEP pg 5). त्यात शिक्षण हे नैतिक, मानवी व संवैधानिक मूल्ये यावर आधारित असावे, या तत्त्वाचा समावेश आहे. बहुलतावाद (pluralism) हा या तत्त्वाचा एक भाग आहे.

बहुलतावाद (Pluralism):

बहुलतावाद ही संज्ञा विविधता असणाऱ्या समाजातील लोकांचे सहजीवन कसे असावे, याविषयीची विचारसरणी स्पष्ट करते. धर्म, भाषा, राहण्याचे ठिकाण, सामाजिक रूढी, परंपरा इत्यादी अनेक गोष्टी माणसाला वेगळेपण देतात, पण त्या आधारे कोणी इतरांच्यापेक्षा मोठेपणा किंवा कमीपणा बाळगण्याचे कारण नसते. तरीही त्यामुळे समाजात अदृश्य भिंती उभ्या राहतात. अशावेळी आपले वेगळेपण न सोडता, माणसाने इतरांच्या वेगळेपणाचा मोकळेपणाने स्वीकार करावा. 

आपल्यापेक्षा ते वेगळे, हीन, अशी भावना बाळगू नये. एकमेकांच्याविषयी सहनशील रहावे आणि आदरभाव बाळगावा अशी विचारसरणी बाळगणे सगळ्यांच्याच हिताची ठरते. असे विधायक नाते जपून विविध मानवी समूह सामोपचाराने आणि सहयोगाने सामूहिक प्रगती साधू शकतात, असे मानणारी उदार विचारसरणी म्हणजे बहुलतावाद.

बहुलतावाद कशासाठी?

बहुलतावाद स्वीकारण्यामुळे विविध समूहातील मतभेदांची धार कमी होते. मनभेद  निर्माण न होता निकोप मतभेदासह एकत्र राहून एकमेकांना सहयोग देण्याची संस्कृती निर्माण होते. ज्याप्रमाणे बहिर्गोल भिंग प्रकाशकिरणांची शक्ती एकवटते, त्याचप्रमाणे बहुलतावाद स्वीकारल्यामुळे विविध समूहांकडे असणारे ज्ञान, कौशल्ये आणि चांगल्या प्रथा, परंपरा अशा विधायक बाबी एकवटतात. त्यामुळे सर्वच समूह परस्परांना समृद्ध करू शकतात. या उलट संघर्षातून या विधायक क्षमतांची कमीअधिक प्रमाणात वजाबाकीच होते.

शालेय शिक्षणातून बहुलतावादाची रुजवणूक :

कुटुंबांपासून जागतिक स्तरापर्यंत जागोजागी विविध समूहात असणाऱ्या मतभेदांचे दर्शन नेहमीच होत असते. अशावेळी बहुलतावाद ही उदार विचारसरणी मानवी व्यवहारात रुजवणे हे आव्हान असते. निरनिराळ्या सामाजिक चळवळीतून या वाटेवर हळूहळू प्रगती होत आली आहे. शाळेतील संवेदनशील वयात योग्य शिक्षणपद्धती अनुसरून हे काम पद्धतशीरपणे आणि गतीने करता येते. 

शाळेत बहुलतावादाची पायाभरणी व्यापक प्रमाणात करता येते. म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण धोरणात याचा आवर्जून समावेश केला आहे. हा विचार पाठ्यपुस्तके, अध्ययन अध्यापन पद्धती, शिक्षक प्रशिक्षण इत्यादीतून पुढे नेण्याचे प्रयत्न केले जातात.

मूल्यवर्धन उपक्रमातून बहुलतावादाची मशागत:

मूल्यवर्धन उपक्रम या सर्व प्रयत्नांना चांगले पाठबळ देऊ शकतात, याची कोणती कारणे आहेत?

उपक्रमातून बहुलतावादावर विचार करण्याच्या संधी:

बहुलतावादावर व्याख्यान देणे, संविधानातील उद्देशिका रोज परिपाठात म्हणून घेणे अशा प्रयत्नांतून मुलांना त्याविषयीची पुरेशी समज येऊ शकत नाही. अपेक्षित भावनिक परिणामही साधला जात नाही. मूल्यवर्धनमध्ये बहुलतावादाच्या दिशेने नेणारे अनेक उपक्रम आहेत. 

या  उपक्रमात मुलांना आपण स्वतः आणि इतरांमधील वेगळेपणा शोधण्याच्या, ते योग्य की अयोग्य यावर विचार करण्याच्या संधी मिळतात. त्यातून सुरुवातीला वर्गातील मित्र-मैत्रिणींमधील आणि नंतर समाजातल्या विविध घटकांमधील विविधतेचे दर्शन होत जाते. हे दर्शन बहुलतावाद समजून घेताना उपयोगी पडते. असे प्रमुख उपक्रम कोणते आहेत याचे विवरण पुढे केले आहे.

स्वजाणीव विभाग:

बहुलतावादाशी संबंधित उपक्रम: इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व उपक्रम पुस्तिकांत 'स्व जाणीव' हा उपक्रम विभाग आहे. त्यात प्रत्येक इयत्तेच्या पुस्तिकेत ८ ते १० उपक्रम आहेत. यात आपण आपलेच निरीक्षण करण्याची एक अनोखी संधी प्रत्येक मुलाला मिळते. मुले स्वतःचे गुण, कमतरता, सवयी, आवडी-निवडी इत्यादी आपल्या अंतरंगाचे विविध पैलू इतरांच्या समोर सादर करतात. 

यावेळी मुलांना वर्गातल्या मित्रमैत्रिणींच्या एका छोट्या गटात किती विविधता असू शकते, याची जाणीव होते. बहुलतावादाची ओळख करून देण्याचा पाया म्हणून हे अनुभव उपयोगी ठरतात.

विभाग स्वजाणीव : बहुलतावादाशी संबंधित उपक्रम

      उदा. 2.2.2 माझ्या क्षमता, 2.2.3 माझ्या आवडी निवडी 2.2.4 माझे आवडते छंद 2.2.7 माझ्या भावना 4.2.2 छंद (अब्राहम लिंकन), 4.2.3 माझे गुण आणि कमतरता 5.2.3 माझे ध्येय 5.2.7 शब्दाविना बोलणे (विविध भावना) 5.3.1 अभ्यासाच्या सवयी 5.3.2 ताण-तणाव, 7.1.9 आपल्या मतांमधील विविधता

विभाग नातेसंबंध : बहुलतावादाशी संबंधित उपक्रम

उदा. 1.4.4 आपण सगळे वेगळे वेगळे, 2.4.2 भिन्न तरीही सारखे.


विभाग सामाजिक जबाबदाऱ्या : बहुलतावादाशी संबंधित उपक्रम:

स्व-जाणीव या विभागातले उपक्रम मुख्यतः वर्गपातळीवर मुलांमध्ये असलेल्या विविधतेचे दर्शन घडवतात. तर सामाजिक जबाबदाऱ्या विभागातील उपक्रम गाव, राज्य, देश इत्यादी व्यापक स्तरावरील मानव समूहातील विविधतेची जाणीव करून देतात. या विभागातील उपक्रमांची शीर्षके वाचली तरी हे सहजपणे लक्षात येते.

उदा.- 1.5.2 वेगवेगळी फळे आणि भाज्या (प्रदेशांनुसार भाज्या, फळे) 2.5.5 प्रार्थनास्थळे  2.5.6 आपले सण  2.5.7 भारतातील मुले (कविता) 3.5.2 लोककला 3.5.4 आपल्याला मदत करणारे लोक 4.5.5 विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती (दिव्यांग)  4.5.5 आपल्या भाषा 4.5.9 उत्सव साजरा करूया 6.4.1 भारतातील विविधता 6.4.2 विविधतेचे फायदे 6.4.8 काम करण्याची लोकशाही पद्धत 7.4.1 विविधता स्वीकारून जगणे 7.4.8 लोकशाहीची प्रमुख वैशिष्ट्ये 8.4.2 आमची वैविध्यपूर्ण कुटुंबे 8.4.10 लोकशाहीवादी प्रक्रिया

संत ज्ञानेश्वर यांनी देशादेशांतील सीमा पुसून माणसाने “हे विश्वची माझे घर” मानावे असे पसायदान मागितले आहे. हे बहुलतावादाचे शिखरच मानता येईल. आपण आपल्या मुलांना या शिखराकडे घेऊन जाऊया.