Banner

मुलांना आपल्याशा वाटणार्‍या मूल्यवर्धन पुस्तिकांचे अंतरंग

इयत्ता पहिलीच्या मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेची झलक


महाराष्ट्र (दि. ११ मार्च २०२६)

संविधानाच्या वाटेवर चिमुकली पाऊले

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही संविधानात असलेली मोठमोठी मूल्ये आहेत. मग लहान मुलांच्यात ती रुजवणं तरी शक्य आहे का? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. या प्रश्नाच्या उत्तराची वाट मूल्यवर्धन उपक्रम दाखवतात. या वाटेवर मुलांच्या स्व-जाणीव, वैयक्तिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध आणि सामाजिक जबाबदार्‍या या क्षमता विकसित होत जातात. इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी ही वाट कशी सोपी होते? हे जाणून घेऊया श्री. विद्याधर शुक्ल, उपसंचालक (सेवानिवृत्त), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि सल्लागार, शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन, पुणे यांच्या विचारातून. 

 

पहिलीची उपक्रम पुस्तिका

मूल्यवर्धन ‘विद्यार्थी उपक्रम पुस्तिका’ मुलांना आपलीशी वाटते. शिक्षकांची वाट न पाहता ती उत्साहाने उपक्रमांच्या रंगीबेरंगी बागेत पूर्ण फेरफटका मारतात. कविता म्हणणं, चित्र काढणं, प्रसंगचित्रांचं निरीक्षण, घरी पालक आणि शेजाऱ्यांशी गप्पागोष्टी इत्यादी आवडत्या कृती करताना मुलांची पुस्तिकांशी मैत्री जमत जाते. ही गंमत अनुभवताना ती क्षमतांच्याही पायऱ्या कशा चढत जातात, ते काही उदाहरणांतून पाहूया.

 

स्व-जाणीव

स्वतःची ओळख ही साऱ्या क्षमतांच्या विकासाची वाट तयार करते. असे काही उपक्रम पाहूया.

  • माझा परिचय' या उपक्रमात मुलं कवितेतून आपलं नाव आणि आवड सांगून स्व-जाणिवेच्या दालनात पाऊल टाकतात.
  • आम्ही करू शकतो' या उपक्रमात रोजच्या दिनचर्येतल्या कोणकोणत्या गोष्टी करता येतात, त्या गोष्टी मुलं ओळखतात. आपल्याला येणाऱ्या इतरही गोष्टी सांगतात.
  • माझी शाळा' या उपक्रमात स्व-जाणिवेचा परीघ आणखी वाढतो. मुलं पुस्तिकेत आपल्या शाळेचं चित्र काढतात. शाळेबद्दलची माहिती घरच्यांना सांगतात.
  • आनंद' या उपक्रमातील गाणे म्हणताना आपले छंद आठवतात.
  • राग आला की’ या उपक्रमात प्रसंगचित्रे पाहून त्यात मुलांना राग आवरण्याच्या कृती ओळखायला मिळतात.

 

वैयक्तिक जबाबदाऱ्या

या विभागातले उपक्रम घरी किंवा बाहेर वावरताना नियम का पाळले पाहिजेत, या विषयीच्या जबाबदार्‍यांची जाणीव मुलांना करून देतात. असे काही उपक्रम पाहूया.

  • आपल्या वर्गाचे नियम या उपक्रमातले गाणे म्हणताना वर्गात कसं वागलं पाहिजे, कसं वागू नये याची जाणीव मुलांना होते.
  • स्वतःची काळजी या उपक्रमात मुलं कविता म्हणतात. प्रसंगचित्रे पाहून स्वच्छतेच्या चांगल्या-वाईट सवयी ओळखतात. घरच्यांशी बोलून चांगल्या सवयींची यादी करतात.
  • योग्य की अयोग्य या उपक्रमात मुलं भावंडांशी आणि इतर मित्र-मैत्रिणींशी कोणतं वागणं योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे, याविषयी विचार करायला शिकतात.

 

नातेसंबंध

हा विभाग मुलांना कुटुंब आणि समाजाची ओळख करून देतो. त्यापैकी काही उपक्रम पाहूया.

  • माझे कुटुंब या उपक्रमात कुटुंबाविषयीचे गाणे मुले म्हणतात. आपल्या घरी कोणकोण आहेत, त्यांची चित्रंही पुस्तिकेत काढतात. आपल्या मित्र-मैत्रिणींच्या कुटुंबामध्ये कोणकोण आहेत, हे घरच्यांना सांगतात.
  • मदत करणारे मित्र या उपक्रमात एकमेकांना मदत केल्याचे प्रसंग मुले आठवतात. घरातील व्यक्तींना त्यांच्या मित्रांनी त्यांना कोणती मदत केली, याविषयी विचारतात.
  • इतरांच्या भावना या उपक्रमात निरनिराळ्या प्रसंगचित्रातील व्यक्तींना काय वाटत असेल, हे जाणून घेण्याची आणि व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळते.

 

सामाजिक जबाबदाऱ्या

सामाजिक जबाबदाऱ्या हा विभाग समाजात वावरताना असणाऱ्या निरनिराळ्या जबाबदाऱ्यांची जाणीव मुलांना करून देतो. त्यापैकी काही उपक्रम पाहूया.

  • माझ्या घराचा परिसर या उपक्रमामध्ये आपलं घर आणि परिसराचं चित्र पुस्तिकेमध्ये काढतात, त्यांची नावं लिहितात.  
  • प्राणी आणि पक्षी यात काही प्राणी आणि पक्षी यांची चित्र पुस्तिकेत काढतात, त्यांची नावं लिहितात.  
  • प्राण्यांची आणि पक्षांची काळजी यामध्ये ‘आम्ही झाडे झुडपे वेली’ हे गाणं म्हणतात. कोणत्या चित्रात प्राण्यांची काळजी घेतली जाते ते ओळखतात.
  • पाण्याचा वापर ‘वाया घालवू नका कोणी’ हे गाणं म्हणतात. पाण्याचा वापर कोठे कोठे होतो ते आठवून त्या कृतींची चित्रे काढतात.

 

पुढच्या इयत्तांच्या पुस्तिका अशाच आहेत का?

होय, पुढच्या इयत्तांच्या पुस्तिकाही अशाच आहेत. मात्र मुलांचे वय जसे वाढते तसे त्यांचे विचार, भावना बदलतात. हे ध्यानात घेऊन त्यांना आवडतील, संविधानाच्या वाटेवर त्यांची पावले आणखी पुढे पडतील, असे उपक्रम त्यात आहेत. त्याही पुस्तिका वाचूया आणि याचा अनुभव घेऊया.